मुंबईतील वाढत्या महागाईचा फटका ‘शालेय पोषण आहारा’ला; पूरक आहार बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:32 AM2023-11-16T11:32:23+5:302023-11-16T11:34:09+5:30
महिला बचत गटांचा जीव मेटाकुटीला
मुंबई : वाढत्या महागाईमुळे मुंबई महापालिकेच्या जवळपास दोन हजार शाळांमध्ये अवघ्या सहा ते आठ रुपयांत ‘शालेय पोषण आहार योजना’ राबविताना महिला बचत गटांचा जीव मेटाकुटीला येतो आहे. याच कारणामुळे या शाळांमध्ये आहारासोबत दिला जाणार पूरक आहार जवळपास बंदच आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात पालिकेच्या आणि पालिकेकडून अनुदान मिळणाऱ्या खासगी संस्थांच्या अशा मिळून तब्बल १,९३९ शाळांमध्ये ‘शालेय पोषण आहार योजना’ राबविली जात आहे. ‘इस्कॉन’सह सुमारे १६० महिला मंडळे पालिकेकरिता ही योजना राबवितात. खिचडी, पुलाव, वरणभात, आमटीभात हे पदार्थ मुलांना भोजनात दिले जातात. काही वर्षांपूर्वी पूरक आहार म्हणून चिक्की, राजगिरा लाडू, सोया बिस्कीट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, निधीअभावी तो आवरता घ्यावा लागला. केंद्र आणि राज्य सरकारकडून येणाऱ्या अनुदानावर ही योजना पालिका राबवते.
भोजनात काय देतो?
सोमवार : खिचडी (मूगडाळ घालून)
मंगळवार : आमटी (हरभरा किंवा मटकी किंवा चवळीची) व भात.
बुधवार : वरण (मूग, तूरडाळीचे) व भात
गुरुवार : मसालेभात किंवा पुलाव (क जीवनसत्व असलेल्या भाज्या, वाटाणा)
शुक्रवार : आमटी (हरभरा किंवा मटकी किंवा चवळीची) व भात
शनिवार : वरण (मूग, तूरडाळ) व भात
पूरक आहार तर जवळपास बंदच आहे. परंतु, मुंबईत साडेपाच रुपयांत अंडे देणे परवडणारे नाही. ही योजना राबविण्यासाठी अनुदान वाढवले पाहिजे.
- संजना घाडी, अध्यक्ष, महाराष्ट्र महिला बचत गट महासंघ