प्लॅटफॉर्मची उंची ठरतेय धोकादायक

By admin | Published: January 29, 2016 01:30 AM2016-01-29T01:30:20+5:302016-01-29T01:30:20+5:30

बोरीवली स्थानकात धावत्या ट्रेनमधून उतरताना एक महिला ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडली आणि या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाल्यानंतर कमी उंचीचे प्लॅटफॉर्म अजूनही

Rising platform height is dangerous | प्लॅटफॉर्मची उंची ठरतेय धोकादायक

प्लॅटफॉर्मची उंची ठरतेय धोकादायक

Next

मुंबई : बोरीवली स्थानकात धावत्या ट्रेनमधून उतरताना एक महिला ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडली आणि या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाल्यानंतर कमी उंचीचे प्लॅटफॉर्म अजूनही धोकादायक ठरत असल्याचेच समोर आले. २0१४ शी तुलना केल्यास २0१५ मध्ये अशा प्रकारच्या अपघातांमध्ये वाढ होऊन ४0 प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत.
कमी उंचीच्या प्लॅटफॉर्ममुळे मोनिका मोरे या विद्यार्थीनीला घाटकोपर स्थानकात झालेल्या अपघातात आपले दोन्ही हात गमवावे लागले होते. या घटनेनंतर बराच गाजावाजा झाल्यानंतर आणि न्यायालयानेही फटकारल्यावर प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी यापूर्वी मार्च २0१५ आणि त्यानंतर मे २0१५ अंतिम मुदत होती. मात्र हीच मुदत मार्च २0१६ ठेवण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर एकूण १४५ प्लॅटफॉर्म आहेत. यातील ४७ प्लॅटफॉर्मची उंची सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आणि त्यानुसार प्रथम या प्लॅटफॉर्मची उंची पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्याचबरोबर मध्य रेल्वेवरील ७६ स्थानकांवर २७३ प्लॅटफॉर्म आहेत. यात धोकादायक अशा ८३ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याच्या कामांपैकी ४८ प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले आहे. इतर स्थानकांतील कार्य प्रगतीप्रथावर आहे. ही कामे सुरु असतानाच कमी उंचीच्या प्लॅटफॉर्ममुळे अजूनही प्रवाशांचा जीव मात्र जात असल्याचे समोर आले आहे. २0१४ मध्ये ३४ प्रवाशांना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये पडून जीव गमवावा लागला. तर २0१५ मध्ये हे अपघात कमी होणे अपेक्षित असतानाच ४0 प्रवाशांना प्राण गमवावे लागले. पश्चिम रेल्वेवर सर्वाधिक अपघात झाले असून दोन वर्षात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

‘त्या’प्लॅटफॉर्मची उंची वाढणार
एक्सप्रेसमधून उतरताना ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडून किरण कोठारी या महिलेचा मृत्यू झाला होता. ही घटना निदर्शनास आल्यानंतर बोरीवलीतील ‘त्या’प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे पश्चिम रेल्वे विभागीय व्यवस्थापक शैलेन्द्र कुमार यांनी सांगितले.

Web Title: Rising platform height is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.