Join us

शुटिंग स्पर्धेतील उभरता तारा "रुद्राक्ष पाटील", ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने वेगवान वाटचाल!

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Published: October 14, 2022 7:27 PM

इजिप्तमधील विजयानंतर संपूर्ण देशाच्या आशा रुद्राक्षवर.

पालघर : कैरो-इजिप्त येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील १० मीटर्स रायफल स्पर्धेत रुद्राक्ष बाळासाहेब पाटील ह्यांनी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदका सह विश्वविक्रम करून २०२४ मध्ये फ्रांस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचा पहिला कोटा मिळविला. टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील तीनही विजेत्या स्पर्धकावर मात करीत रुद्राक्षने ह्या सुवर्ण पदकाला गवसणी घातली हे विशेष म्हणता येईल.

पालघर चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि वाशी येथील आरटीओ विभागात उपयुक्त असलेल्या हेमांगिनी पाटील ह्या दाम्पत्याचा मोठा मुलगा रुद्राक्ष ने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या अत्युच्च कामगिरीच्या जोरावर स्वतःचे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.त्याने आता पर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत २०सुवर्ण,१२रौप्य आणि ७ रजत पदक मिळवित खेलो इंडिया युथ स्पर्धा २०२० मध्ये सुवर्ण पदक मिळविले असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने ८सुवर्ण,३रौप्य पदके मिळवीत १८ वर्षीय ह्या तरुणांनी स्वतःला सिद्ध केले आहे.

रुद्राक्ष सध्या सिनियर वर्ल्ड रँकिंग च्या ७व्या क्रमांकावर असून ज्युनिअर वर्ल्ड रँकिंग मध्ये १ ल्या नंबर वर आहे.कैरो इथे त्याने मिळविलेल्या १०मीटर्स रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या कोट्यात स्थान मिळविले असून त्याची दिवसेंदिवस सुरू असलेली प्रगती पाहता आगामी ऑलिम्पिक मध्ये तो देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यात कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास त्याचे वडील बाळासाहेब पाटील ह्यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :मुंबईपालघरगोळीबार