डेल्टा प्लसच्या म्युटेशनचा धोका कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 07:23 AM2021-06-28T07:23:35+5:302021-06-28T07:24:28+5:30
प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट; विषाणूतील बदल चाचणी अहवालातून येतात समाेर
मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून त्यापैकी विविध विभागांतील ५० रुग्णांचे नमुने पुण्याच्या नॅशनल वायरॉलॉजी इन्स्टिट्यूटकडे जीनोम सिक्वेन्ससाठी पाठवले जातात. या नमुन्यांचा अहवाल एक ते दीड महिन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पाठवला जातो. या चाचणीच्या अहवालातून विषाणूमध्ये झालेला बदल म्हणजेच त्याचे म्युटेशन झाले आहे का, याची माहिती तसेच रुग्णाला कोणत्या प्रकारच्या कोरोनाची लागण झाली आहे, हे समजते. शहरात ही लागण इतरही रुग्णांना झाली आहे का, याचीही माहिती मिळते. त्यावरून उपाययोजना करण्यात येतात, अशी माहिती मुंबई महापालिकेच अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. सद्य:स्थितीत राज्यात डेल्टा प्लस म्युटेशनचा धोका कायम आहे.
राज्यात दीड वर्षे कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. यादरम्यान विषाणूने आपले रूप अनेक वेळा बदलले. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला. ताे काही प्रमाणात कमी होत असतानाच ऑक्टोबरमध्ये कोरोना विषाणूमध्ये बदल दिसून आला. डेल्टा विषाणूमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. आता पुन्हा राज्यात विषाणूमध्ये बदल दिसून आला आहे. याला डबल म्युटंट असे बोलले जाते. त्याला डेल्टा प्लस असे नाव देण्यात आले आहे. राज्यात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी रत्नागिरीतील एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे राज्य सरकार, प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला असून राज्यातील निर्बंध कडक केले आहेत.
अहवालासाठी लागताे एक ते दीड महिन्याचा कालावधी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दर आठवड्याला ५० रुग्णांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजेच एनआयव्हीकडे पाठवले जातात. यामधून त्या जिल्ह्यात किंवा त्या शहरात कोणत्या प्रकारच्या विषाणूचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत, याची माहिती मिळते. हा अहवाल सुमारे एक ते दीड महिन्याने संबंधित सरकारी यंत्रणांना सादर केला जातो. ताे राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही सादर केला जातो.
विषाणू उत्परिवर्तन अवस्थेत
nवैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अद्याप डेल्टा प्लस ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ अर्थात ‘उत्परिवर्तन अवस्थेत’ आहे. करोना व्हायरसचे डबल म्युटेशन सर्वात आधी महाराष्ट्रात आढळून आले होते.
nदेशात सर्वात आधी आढळून आलेल्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये बदल होऊन डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.