काळजी घ्या; वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या मार्च महिन्यातच मे महिन्याचा अनुभव येत असून तापमान कमालीचे वाढले आहे. वाढत्या तापमानाचा हृदयविकार रुग्णांना धोका अधिक असताे, त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
उन्हाळ्यात शरीराला द्रव पदार्थांची गरज भासू लागते तसेच शरीराचे तापमान स्थिर राखण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी हृदयाला रक्ताचे अधिक वेगाने पम्पिंग करावे लागते. या प्रक्रियेत बिघाड झालेले किंवा नाजूक हृदय असलेल्यांना तसेच उच्च रक्तदाब व मधुमेहाचा सामना करीत असलेल्या नागरिकांमध्ये उष्माघात, डिहायड्रेशन आणि हृदयविकार होण्याची शक्यता २० टक्क्यांनी वाढत असल्याची माहिती हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. तारळेकर यांनी सांगितले, डिहायड्रेशन म्हणजेच शरीरामधील पाणी कमी होणे. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करीत असलेल्या धमन्या उत्तेजित होऊन हृदयविकार होण्यासाठी कारणीभूत ठरतात. उन्हाळ्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइटस्ची अतिरिक्त हानी होत असल्याने भरपूर पाणी, नारळाचे पाणी, भाज्यांचे सूप, फळांचे रस पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राखणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात कॅफिनयुक्त पेये जास्त घेतल्यास किंवा मद्यपान केल्यास डिहायड्रेशनचा धोका असतो. त्यामुळे हृदयविकार बळावण्याची, गुंतागुंत वाढण्याची शक्यता निर्माण होते. अँजिओप्लास्टी होऊन स्टेंटस् बसविलेल्या किंवा हृदयात कृत्रिम झडपा बसविलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण, डिहायड्रेशनमुळे रक्त दाट होऊन स्टेंटसमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
* उष्माघात झालेल्या व्यक्तीला तातडीने सावलीत न्या!
उष्माघाताबरोबर शरीरात जलशुष्कता (डिहायड्रेशन) असल्यास मळमळ, उलट्या, डोकेदुखी आणि रक्तदाब कमी हाेताे. परिणामी, ती व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. तीव्र स्वरूपाचा उष्माघात असल्यास व्यक्ती गोंधळल्यासारखी होते. कधीकधी संतापते. मद्यपान केल्यासारखी स्थिती होते. नाडी जलद हाेते. श्वसनाचा वेग वाढतो. रक्तदाब कमी झाल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व त्यामुळे हृदयासोबतच शरीरातील इतर अवयवांचे कार्य थांबते आणि मृत्यू ओढवतो. म्हणूनच उष्माघात झालेल्या व्यक्तीला तातडीने सावलीत नेणे गरजेचे आहे. सोबतच त्या व्यक्तीच्या खांद्यावर, कपाळावर आणि मांड्यांवर पाणी ओतावे व पाणी पिण्यास द्यावे. लगेचच जवळच्या रुग्णालयात भरती करावे, असा सल्ला डॉ. तारळेकर यांनी दिला.