मुंबई : हवामानात झालेल्या उल्लेखनीय बदलामुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा धिंगाणा सुरू असून, येत्या ४८ तासांत मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय येत्या चार ते पाच दिवसांसाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्या पुढील दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.
महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. उत्तर अरबी समुद्र ते दक्षिण आंध्र किनारपट्टीपर्यंत पूर्व पश्चिम द्रोणीय क्षेत्र विरून गेले आहे. हवामानातील याच बदलामुळे पावसाचा मारा सुरू असून, १९ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, अशी शक्यता आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातदेखील पावसाची नोंद झाली आहे.