Join us

रिस्क म्हणजे सक्सेस... गुगलची नोकरी सोडून सुरू केला समोसा-कचोरीचा धंदा, महिन्याला लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 9:18 AM

मुनाफ कपाडिया हा गुगलमध्ये अकाऊंट स्ट्रॅटजिस्ट या पदावर कार्यरत होता. नोकरी करता-करता तो सर्वप्रथम मसुरी, नंतर हैदराबाद आणि शेवटी मुंबईत आला. मुंबईत आपली नोकरी सुरु असतानाच, टीबीके नावाने डिलीव्हरी किचनचा व्यवसाय सुरु केला.

मुंबई- गुगलसारख्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागणं म्हणजे आयुष्याचं कल्याण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आयआयटीमध्ये प्रवेश घेताना कित्येक तरुण गुगलमधील नोकरीचे स्वप्न रंगवत असतात. मात्र, गुगलमधील नोकरी सोडून कोणी समोसा विक्रीचा व्यवसाय सुरू करेल ही कल्पनादेखील न पटणारी आहे. मात्र, मुंबईच्या मुनाफ कपाडियाने हे करुन दाखवलंय. विशेष म्हणजे म्हणजे आपला निर्णय योग्यच होता, हेही त्याने सिद्ध करुन दाखवलं. 

मुनाफ कपाडिया हा गुगलमध्ये अकाऊंट स्ट्रॅटजिस्ट या पदावर कार्यरत होता. नोकरी करता-करता तो सर्वप्रथम मसुरी, नंतर हैदराबाद आणि शेवटी मुंबईत आला. मुंबईत आपली नोकरी सुरु असतानाच, टीबीके नावाने डिलीव्हरी किचनचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी, ऑनलाईन ऑर्डर घेण्याचं कामही मुनाफने सुरु केलं. मुनाफ हा बोहरी समुदायाचा असल्याने बोहरी जेवणाचा स्वाद ग्राहकांना देण्याचा मानस त्याने आखला. त्यासाठी, मुनाफच्या आईने त्याला मदत केली. ग्राहकांना बोहरा थाळी चांगलीच पसंद पडली. त्यातून मुनाफच्या व्यवसायाला दमदार सुरुवात झाली.

मुनाफला आपल्या व्यवसाय वाढविण्यासाठी मोठ्या ऑर्डरची आवश्यकता होती. मात्र, सुरुवातीला तेवढी ऑर्डर मुनाफला मिळत नसल्याने त्याने धंदा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचदरम्यान फोर्ब्स इंडिया वृत्तसंस्थेतून मुनाफला फोन आला. मुनाफची सक्सेक स्टोरी फोर्ब्समध्ये '30 अंडर 30' साठी छापण्याचे त्यांनी सांगितले. आपल्या व्यवसायाची दखल फोर्ब्स मॅगझिनने घेतल्यामुळे मुनाफचा आत्मविश्वास वाढला. या आत्मविश्वासाच्या जोरावर मुनाफने पुन्हा व्यवसायात अधिक जोमाने स्वत:ला झोकून दिले. 

मुनाफने 2019 पर्यंत मुंबईतील अनेक भागांत आपल्या व्यवसाय वाढवला. मुनाफच्या स्वादिष्ट जेवणाच्या थाळीची चव अभिनेता ऋषी कपूर, राणी मुखर्जी, ऋतिक रोशन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी चाखली आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे मुनाफचे किचन बंद असून परिस्थिती पूर्ववत होताच ते पुन्हा सुरु होईल. समोशाच्या डिशसोबत मुनाफने चिकन आणि मटनच्या अनेक डिशेश बनविण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मुनाफच्या व्यवसायाला मिळत आहे. त्यातूनन वर्षाला 50 लाख रुपयांच्या पुढे मुनाफला आपल्या धंद्यातून नफा मिळत आहे. नोकरीतून मिळणाऱ्या पगारापेक्षा हा नफा अधिक आहे.  

टॅग्स :व्यवसायगुगलनोकरीमुंबई