Join us

श्वानांना डिस्टेंपर विषाणूचा धोका; मुंबईत वाढतेय रुग्णसंख्या

By स्नेहा मोरे | Published: March 21, 2023 7:08 PM

मुंबईतील श्वानांमध्ये अधिक आढळणारा ‘कॅनाइन डिस्टेंपर’ हा विषाणू संसर्गजन्य असून अन्य प्राण्यांना याचा धोका आहे.

मुंबईमुंबई शहरात कोरोना गोवरनंतर आता इन्फ्लुएंजाच्या साथीने दहशत निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे, शहर उपनगरातील श्वानांमध्येही आता जुना असलेल्या विषाणूने नव्याने डोकेवर काढले आहे. डिसेंबरअखेरीसपासून मुंबईतील श्वानांमध्ये ‘कॅनाइन डिस्टेंपर’ या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत असल्याची माहिती पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, वाढत्या रुग्णसंख्येसह मृत्यूदरही चिंताजनक असल्याचे अधोरेखित केले.

मुंबईतील श्वानांमध्ये अधिक आढळणारा ‘कॅनाइन डिस्टेंपर’ हा विषाणू संसर्गजन्य असून , अन्य प्राण्यांना याचा धोका आहे. या विषाणूबाबत माहिती देताना परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे मुख्य  वैद्यकीय अधिकारी डॉ. बिंदू कुलकर्णी यांनी सांगितले, या विषाणूच्या प्रादुर्भाव झालेले महिन्याला ६०-६५ श्वान रुग्णालयात येत आहेत, दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी ५० टक्के श्वानांचे मृत्यू होत आहे. डिसेंबर पासून सुमारे २००  श्वानांवर उपचार करण्यात आले आहेत. श्वानांमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने या आजारांचा प्रादुर्भाव गतीने होत असल्याचेही डॉक्टरांनी अधोरेखित केले याखेरीज, अनेकदा खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये या श्वानांवर उपचार नाकारले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालयात या विषाणूची लागण झालेले भटके श्वान घेऊन लोक येत आहेत, पाळीव श्वानांच्या तुलनेत भटक्या श्वानांमध्ये याची लागण अधिक होत आहे.

आजार बरा होतो, पण ...

श्वानांना या विषाणूची लागण झाल्यास आजार बरा होतो. मात्र या आजाराचे मज्जा संस्थेवर आणि स्नायूवर दीर्घकाळासाठी परिणाम होतात. त्यातून श्वानांची प्रकृती बिघडून मृत्यूचा धोका संभावतो. त्यामुळे या आजाराएवढेच , त्यानंतर येणारे व्यंग श्वानांसाठी जीवघणे ठरते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

लागण झाल्यास विलगीकरण आवश्यक

श्वानांना या विषाणूची लागण झाल्यास विलगीकरण कक्षात ठेवावे लागते. त्यानंतर रक्त तपासणीनंतर आजाराचे गांभीर्य लक्षात येत असल्याचे डॉक्टारांनी अधोरेखित केले. सध्या रुग्णालयात या विषाणूची लागण झालेले १६ श्वान रुग्णालयात उपचाराधीन आहेत.  

लस द्यायला विसर पडला अन् मृत्यूने गाठले

ठाणे येथील दीड वर्षाच्या पाळीव श्वानाला या विषाणूची लागण झाली होती. हा श्वान अत्यंत देखणा आणि सुदृढ होता, मात्र या श्वानाचे मालक लसीच्या एका डोसनंतर दुसरा देण्यास विसरले आणि या विषाणूने श्वानाची प्रकृती खालावत गेली. अन् लसीकरणाच्या अभावामुळे या श्वानाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लसीकरण हाच मार्ग

श्वानाच्या जन्मानंतर चार आठवड्यांनी पहिला डोस, पुन्हा चार आठवड्यांनी बूस्टर डोस देणे गरजेचे आहे. त्यानंतर दरवर्षी या प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा देणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनेकदा भटक्या कुत्र्यांमध्ये लसीकरण केले नसल्याने या आजाराचे प्रमाण अधिक दिसते. श्वानांना देण्यात येणारी डिस्टेंपर, हेपेटायटिस, पॅराइन्फ्लुएंझा आणि पार्व्हो विषाणूची एकत्रित लस देण्यात येते, ही लस श्वानांना दिली पाहिजे. वैद्यकीय भाषेत या लसीची डीएचपीपी DHPP ही संज्ञा आहे

कॅनाइन डिस्टेंपरबद्दल अधिक...

नवजाक श्वान ते एक वर्षांपर्यंत आणि नऊ वर्षांपेक्षा अधिक असणाऱ्या श्वानांना विषाणूचा प्रादुर्भाव होतो. लसीकरण न झालेल्या श्वानांमध्ये आजार त्वरित वाढतो. श्वानांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे, एका जागी उभे असताना थरथरणे, पायांची हालचाल कमी होणे ही आजाराचे लक्षणे आहेत. अनेकदा श्वानांना समूहात राहण्याची सवय असते, किंवा काही लोक श्वानांना अन्न पदार्थ देतात तेव्हा श्वान समूहाने जमा होतात, अशा स्थितीत विषाणू संसर्जन्य असल्याने एकाच वेळी अनेकांना लागण होण्याचा धोका अधिक बळावतो. 

 

टॅग्स :मुंबई