भय इथले संपत नाही! विक्रोळी, घाटकोपरमध्ये दरडींचा धोका; रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 09:47 AM2024-05-31T09:47:46+5:302024-05-31T09:50:40+5:30
पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची पूर्वतयारी सुरू आहे.
मुंबई : पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची पूर्वतयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून विक्रोळी पश्चिम, पार्कसाईट, घाटकोपर पश्चिम येथील डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तेथील झोपडपट्टीवासीयांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.
पावसाळ्यात दरडी कोसळण्याची, डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या भागातील धोकादायक इमारतींना, झोपड्यांना स्थानिक विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना व नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. तसेच दरवर्षी चेंबूर, भांडुप आदी ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात.
मुंबईतील १४९ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असून या ठिकाणी २२ हजार कुटुंब वास्तव्य करतात. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र, अनेक कुटुंब स्थलांतरित होण्यास नकार देत असल्याने वॉर्ड स्तरावर नोटीस बजावण्यात येणार आहे.
‘दुर्घटना घडल्यास तुम्हीच जबाबदार’-
डोंगराळ भागात राहणाऱ्यांना पालिकेने स्थलांतर करण्यास सांगितले आहे. मात्र, या सूचनेकडे दुर्लक्ष करून तेथेच राहिल्यानंतर नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना, जीवित अथवा वित्तहानी झाल्यास पालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी सांगितले.