स्वाइन फ्लूचा धोका वाढला, स्वत:ची काळजी घ्या; ४ दिवसांत ४० रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 10:24 AM2022-08-07T10:24:15+5:302022-08-07T10:24:32+5:30
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत दहा रुग्णांना दाखल करण्यात आले होते.
मुंबई : मुंबईत पाऊस गायब असला तरीही साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव आहे. त्यातही स्वाइन फ्लूच्या आजाराचा धोका वाढत आहे. मागील चार दिवसांत शहर उपनगरात ४० रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे पालिकेसह राज्याच्या आरोग्य विभाग यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कंबर कसत आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात पालिकेने स्वाइन फ्लूसाठी ४० खाटा तयार ठेवल्या आहेत.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत दहा रुग्णांना दाखल करण्यात आले होते. जून महिन्यात स्वाइनचे केवळ दोन रुग्ण होते, मात्र जुलै महिन्यात याची तीव्रता वाढल्याने अचानक प्रसार वाढत आहे. पालिकेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, एक वर्षाआड स्वाइनचा संसर्ग काहीसा वाढत असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे सध्याच्या प्रादुर्भावाची तुलना मागील वर्षाशी करता येत नाही. मात्र संसर्ग वाढत असल्याने तातडीने उपाययोजना राबवीत आहोत.
स्वाइन फ्लू हा आजार इन्फ्लूएंजा एएच१एन१ या विषाणूपासून होतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यामुळे आणि खोकल्यामुळे उडणाऱ्या थेंबामुळे हा आजार हवेतून इतरत्र पसरतो. सर्वसाधारणपणे या आजाराचे स्वरूप सौम्य असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या आजाराला न घाबरता हा आजार पसरू नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. स्वाइन फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नागरिकांनी स्वत:हून काळजी घेतली पाहिजे. कोणताही आजार वाढू नये आणि त्याचा संसर्ग इतरांना होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार सुरू करणे अत्यावश्यक आहेत. त्याचे साधारणत: तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते.
सौम्य ताप असेल तसेच खोकला, घशाला खवखव होत असेल, डोकेदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत असेल तरी स्वॅब अर्थात थुंकीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावयाची गरज नाही. या रुग्णांचा जनसंपर्क कमी करावा, तसेच घरातील इतर व्यक्तींशी जास्त संपर्क टाळावा. अशा रुग्णांवर त्यांच्या लक्षणानुसार उपचार करणे गरजेचे आहे. या लक्षणांसोबतच तीव्र घसादुखीचा त्रास होत असेल, घशाला सूज आली असेल आणि ताप ९८ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर अशा अतिजोखमीच्या रुग्णांचा (गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, कर्करोग, दमा असे विकार असणाऱ्या व्यक्ती) स्वॅब घेऊन त्याची तपासणी आवश्यक आहे. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करावा.
घरात त्यांना इतर सदस्यांपासून दूर ठेवावे आणि अँटिबायोटिक्सचा वापर करण्यात यावा. रुग्णाच्या सहवासात आल्यामुळे फ्लूसारखी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. फ्लूवरील उपचार ४८ तासांच्या आत सुरू झाल्यास ते अधिक गुणकारी ठरतात. फ्लू प्रतिबंधक लस घेतल्याने संभाव्य धोका टळतो. गर्भवती, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि स्थूल व्यक्ती यांनी ही लस घेणे आवश्यक आहे. याशिवाय, जुनाट गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनीही ही लस आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.