मुंबई - महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कोविड १९ विषाणूच्या सातव्या जिनोम सिक्वेसिंग चाचणीत मुंबईतील २८२ बाधित रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ‘ओमायक्रॉन’ चे तब्बल १५६ म्हणजे ५५ टक्के रुग्ण आढळल्याचे चिंताजनक बाब समोर आली आहे. यामुळे मुंबईत ओमायक्रॉनच्या सामुहिक संसर्गाचा धोका दिसून येत आहे. या १५६ पैकी केवळ नऊ रुग्णांना रुग्णालयात उपचाराची गरज भासली असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २८२ रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या २८२ नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे १३ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३२ टक्के तर ‘ओमायक्रॉन’ चे ५५ टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविडच्या डेल्टा या उपप्रकारापेक्षा ओमायक्रॉन सौम्य आहे. मात्र, त्याचा संसर्गाचा वेग आतापर्यंतच्या सर्व उपप्रकारांपेक्षा जास्त असल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
२८२ रुग्णांचे वयोगटनिहाय वर्गीकरण
• ० ते २० वर्षे - ४६ रुग्ण (१६ टक्के)
• २१ ते ४० वर्षे - ९९ रुग्ण (३५ टक्के)
• ४१ ते ६० वर्षे - ७९ रूग्ण (२८ टक्के)
• ६१ ते ८० वर्षे - ५४ रुग्ण (१९ टक्के)
• ८१ ते १००वर्षे - ४ रुग्ण (१ टक्के)
बाधित रुग्णांचे वर्गीकरण
• डेल्टा व्हेरिअंट - ३७ रुग्ण (१३ टक्के)
• डेल्टा डेरिव्हेटीव्ह - ८९ रुग्ण (३२ टक्के)
• ओमायक्रॉन - १५६ रुग्ण (५५ टक्के)
* ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेल्या १५६ पैकी फक्त नऊ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी कोणालाही लक्षणे आढळली नाहीत. तसेच त्यांना ऑक्सिजन पुरवठा किंवा अतिदक्षता विभागातही दाखल करावे लागले नाही.
* २८२ पैकी फक्त १७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी पहिला डोस घेतलेले फक्त तीन जण रुग्णालयात दाखल आहेत. दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी अवघे १० जण रुग्णालयात दाखल. लसीचा एकही डोस न घेतलेल्या ८१ पैकी चार जण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
* डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित दोघांनाच अतिदक्षता उपचारांची गरज भासली. यापैकी एका डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती ६० वर्षापेक्षा अधिक वयाची होती. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. तसेच त्यांनी कोविड लसीचा फक्त पहिला डोस घेतला होता.