मुंबई : घरगुती गणपतींच्या विसर्जनानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात भक्तांच्या रांगा वाढल्या आहेत. गणेशोत्सवाचे शेवटचे चार दिवस उरले असल्यामुळे मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहोचला असून गर्दी आणि अस्वच्छता राहिल्यास साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे पुढच्या चार दिवसांत मंडळांनी आणि भक्तांनी विशेष काळजी घ्या, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तगण तासनतास रांगा लावतात. रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरत राहतात. त्यामुळे भक्त आजारी पडण्याचा धोका अधिक आहे. आॅगस्ट महिन्यानंतर मुंबईत पावसाचा जोर कमी होतो. पण, गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केल्यास, सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसून आली आहे.साचलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची पैदास होते. अनेकदा मंडपाच्या आजूबाजूला कचरा पडलेला असतो. त्यात पाणीदेखील साचलेले असते. पण, भक्तांच्या गर्दीमुळे स्वच्छता करता येत नाही अथवा शक्य होत नाही. त्यामुळे मंडपाच्या मागे, आजूबाजूला अशा प्रकारे पाणी साठून राहिल्यास त्यात डासांची पैदास होऊ शकते. त्यामुळे कचरा, पाणी साठून राहू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. महापालिकेने साथीच्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी लोअर परेल भागात फलक लावले आहेत. (प्रतिनिधी)
गर्दी, अस्वच्छतेमुळे आजार पसरण्याचा धोका
By admin | Published: September 12, 2016 3:39 AM