- सागर नेवरेकरमुंबई : माळढोक पक्ष्याची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधूनही माळढोक नामशेष होत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले. माळढोक पक्ष्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. परंतु माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून सरकारचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत, अशी खंत पक्षिप्रेमींनी व्यक्त केली आहे.माळढोक पक्षी हा १०० वर्षांपूर्वी दख्खन पठारावर आढळत होता. मराठवाडा, खान्देश, नाशिकचा काही भाग या ठिकाणी माळढोक आढळत होते. अहमदनगरमध्ये १८०९ ते १८२९ दरम्यान एका ब्रिटिश अधिकाऱ्याने ९६१ माळढोक पक्षी मारल्याची नोंद आहे. त्यानंतर शिकारीमुळे त्यांचा अधिवास कमीकमी होत गेला. वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा १९७२ साली आला. त्यानंतर माळढोक पक्ष्यांची शिकार बंद झाली. पाच ते दहा वर्षांमध्ये नाणज परिसर, सोलापूर, उत्तर सोलापूर आणि उस्मानाबादचा काही भाग व चंद्रपूरमध्ये हे पक्षी आढळत होते. पूर्वी केव्हाही अभयारण्यात गेलो तर ते दिसायचे. आता सोलापूर, चंद्रपूर येथे कधीतरी एखादा पक्षी आढळून येतो, अशी माहिती नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रकल्प संशोधक सुजीत नरवडे यांनी दिली.
माळढोकचे अस्तित्व धोक्यात, पक्षिप्रेमींची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 5:15 AM