राज्यपाल भगतसिंह कोश्यारी : कोरोना काळात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटत आहे. लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी केले.
कोरोना उद्रेकानंतर शाळा व कंपनीच्या बसेस व वाहने गरजू रुग्णांच्या सेवेकरिता रुग्णवाहिका सेवा म्हणून वापरल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील ५० जणांचा स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार राजभवन येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रुग्णवाहिका चालक, व्यवस्थापक, स्कूल बसमालक व स्कूल व कंपनी बस चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता.
राज्यपाल म्हणाले, ‘कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत राज्यातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. लाखोंचे रोजगार गेले व उत्पन्न कमी झाले. हॉटेल उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचे रोजगार गेले. तसेच मालकांचेही उत्पन्न घटले. यावेळी कोरोना योद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता देवदूतांप्रमाणे काम केले.’
वाहनचालकांचे किंवा कोणत्याही श्रमिकांचे काम गौण नसून ते महत्त्वाचे आहे. वाहनचालक नसेल तर राष्ट्रपती असो वा राज्यपाल, सर्वांचे व्यवहार ठप्प होतील असे सांगून राज्यपालांनी वाहनचालकांना कौतुकाची थाप दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग, सचिव दीपक नाईक व महासचिव रमेश मणियन आदी उपस्थित होते.