लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विषाणूमध्ये जनुकीय बदल होत असतो. त्यामुळे आतापर्यंत कोरोना विषाणूत झालेले बदल सामान्यांची चिंता वाढविणारे आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल केले असताना वाढत्या गर्दीत म्युटेशनचा धोका कायम असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना त्रिसूत्री पालन करण्याचे आवाहन राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी केले आहे.
नॅशनल इन्स्टिट्य़ूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस व क्वाझुलू नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्म या संस्थांनी याबाबत संशोधन केले आहे. सी १.२ हा विषाणू मे महिन्यात दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. पण नंतर चीन, काँगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल व स्वित्झर्लंड येथे तो १३ ऑगस्टपर्यंतच्या काळात आढळला आहे. मेडआरएक्सआयव्ही या नियतकालिकात याबाबतचा संशोधन निबंध प्रसारित करण्यात आला असून त्या विषाणूचे मूळ दक्षिण आफ्रिका हे आहे.
कोणत्याही विषाणूत जनुकीय बदल होत असतात. त्यामुळे या जनुकीय बदलाच्या माध्यमातून संसर्गाची तीव्रता कमी-अधिक होण्याचा धोका असतो. याखेरीज, या विषाणूच्या म्युटेशनवर लसीकऱण प्रभावी ठरते की नाही यावर जागतिक स्तरावर संशोधन सुरू असल्याची माहिती राज्याच्या कोरोनाच्या टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.
डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, सध्या राज्यात या विषाणूचा एकही रुग्ण नाही. मात्र निर्बंध शिथिलता , आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका कायम आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरताना कोरोना नियमावलींचे पालन कऱणे गरजेचे असल्याचेही डॉक्टरांनी अधोरेखित केले.