मुंबई : दिवाळीनंतर राज्यासह मुंबईत कोरोनाचा धोका वाढेल, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र, समाधानकारक बाब म्हणजे, तज्ज्ञांनी वर्तविलेल्या निरीक्षणानुसार राज्यासह मुंबईची रुग्णसंख्या व मृत्यूच्या प्रमाणात तितकीशी वाढ झाली नसल्याचे समोर आले. आता टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबरअखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु, राज्यातील तापमानात घट झाल्यास, शिवाय प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यापूर्वी मे, जून आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढली होती.
मुंबईतील २ हजार २५० कोरोनाबाधित रुग्णांची दुहेरी नोंद बुधवारी केंद्र शासनाच्या आयसीएमआर संकेतस्थळावर करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची क्षमता वाढविली असून रुग्णांच्या सहवासितांच्या शोधावरही भर दिला आहे.