वायू वादळाचा धोका ओसरला; मुंबईला पावसाचा इशारा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 06:19 AM2019-06-11T06:19:33+5:302019-06-11T06:20:01+5:30
मान्सून कर्नाटकच्या वेशीवर; महाराष्ट्रात दाखल होण्यास १५ जूननंतरचा कालावधी उजाडेल, हवामान खात्याने वर्तविला अंदाज
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. परिणामी वायू चक्रीवादळाचा महाराष्ट्र राज्यास असलेला धोका तूर्तास तरी ओसरला आहे. मात्र चक्रीवादळाने हवामानात महत्त्वपूर्ण बदल झाले असून याचा परिणाम म्हणून मुंबईत १५ जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे मान्सूनचा प्रवासही वेगाने सुरू असून कर्नाटकच्या वेशीवर असलेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास १५ जूननंतरचा कालावधी उजाडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईत काही काळ हवामान गरम आणि आर्द्र नोंदविण्यात येत आहे. रविवारी रात्री मुंबईत गडगडाटासह पाऊस नोंदविला गेला. यामुळे दीर्घकाळापर्यंत सुरू असलेल्या कोरड्या वातावरणाला पूर्णविराम मिळाला. गेल्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ३ मिमी तर कुलाबा येथे १ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे तापमानातदेखील काही प्रमाणात घट झाली. या पावसाचे श्रेय कमी दाबाच्या क्षेत्राला जात असून हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे मुंबई आणि उपनगरात पूर्व मान्सूनच्या पावसाचा लपंडाव पुढील काही दिवस सुरू राहील. १२ जून रोजी मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. तसेच १५ जूनच्या आसपास पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे.
पावसामुळे कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होऊन ३३ अंशांच्या आसपास स्थिरावेल. आगामी दिवसांमध्ये हवामान ढगाळ राहील आणि वाऱ्याचा वेगदेखील वाढेल. दक्षिणेकडून येणाºया वाऱ्यांची पश्चिम किनारपट्टीवर रेलचेल असेल. ज्यामुळे मुंबईसह किनारी भागात समुद्र खवळलेला असेल. ही स्थिती १५ जूनपर्यंत राहण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाणे टाळा, असे आवाहन मच्छीमारांना हवामान खात्याने केले आहे.
मुंबईत दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस
११ आणि १२ जून रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस पडेल. तसेच ११, १२ आणि १३ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.