Join us

महापौरपदाचा उमेदवार असावा रितेश देशमुख,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:09 AM

- काँग्रेसच्या धोरण समितीची शिफारस, निवडणुकीपूर्वी नाव घोषित करालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई काँग्रेसने आगामी पालिका निवडणूक ...

- काँग्रेसच्या धोरण समितीची शिफारस, निवडणुकीपूर्वी नाव घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई काँग्रेसने आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर आता त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या धोरण समितीच्या अहवालावरून तसे संकेत मिळत आहेत. या समितीने निवडणुकीसंबंधी अहवाल सादर केला असून, त्यात महापौरपदाचा उमेदवार रितेश देशमुख, सोनू सूद किंवा मिलिंद सोमण यांच्यासारखा म्हणजेच सामाजिक पार्श्वभूमीचा असावा, अशी शिफारस केली आहे. शिवाय संबंधित व्यक्तीचे नाव निवडणुकीपूर्वी घोषित करावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

काँग्रेसने पालिका निवडणुकीपूर्वी चाचपणी करण्यासाठी विविध समित्या बनविल्या आहेत. त्यापैकी धोरण समितीचे सचिव गणेश यादव यांनी नुकताच अहवाल सादर केला. त्यात निवडणुकीची रणनीती कशी असावी, याबाबत सूचना करण्यात आली आहे. महापौरपदाचा उमेदवार निवडताना विशेष काळजी घ्यावी. संबंधित व्यक्ती राजकीय पार्श्वभूमीचा नसावी. त्याऐवजी सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तिमत्त्वाला संधी द्यावी. युवकांसह सर्व समाजघटकांना मान्य असेल, मतदारांशी नाळ जोडलेली असेल, अशा व्यक्तीला प्राधान्य देण्यात यावे, असे या अहवालात म्हटले आहे.

विशेष म्हणजे महापौरपदाचा संभाव्य उमेदवार हा रितेश देशमुख, सोनू सूद किंवा मिलिंद सोमण यांच्यासारखा असावा, असे समितीने म्हटले आहे. वास्तूविशारद, नगररचनाकार, नवउद्यमी अशा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचाही विचार केला जाऊ शकतो. या उमेदवाराचे नाव निवडणुकीपूर्वी घोषित करावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

...............

असे करा तिकीट वाटप...

तिकीट वाटप करताना काही प्रमाणात युवा चेहऱ्यांना संधी मिळेल, याची काळजी घ्या. सामाजिक कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क असलेल्या नवउद्योजकांचाही विचार करावा, जेणेकरून प्रतिमा सुधारली जाईल, अशी शिफारसही धोरण समितीच्या अहवालात करण्यात आली आहे.