विलासरावांच्या ‘स्पर्शा’ने रितेश देशमुख गहिवरला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:45 PM2020-05-26T22:45:14+5:302020-05-26T22:45:21+5:30
एक प्रसन्न, दिलखुलास, अजातशत्रू, चतुरस्त्र अन् बेधडक नेतृत्व ही विलासरावांची खास ओळख.
मुंबई : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७५ व्या जयंतीदिनी (२६ मे) काँग्रेस कार्यकर्ते आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांनी सोशल मीडियातून त्यांना अभिवादन केले. अभिनेता रितेश देशमुख यांनी पोस्ट केलेल्या एका हृदयस्पर्शी व्हिडीओतील ‘व्हर्च्युअल
स्पर्शा’नं अनेकांना गहिवरून आले. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीयांना, मित्र-मैत्रिणींना शेअर केला.
एक प्रसन्न, दिलखुलास, अजातशत्रू, चतुरस्त्र अन् बेधडक नेतृत्व ही विलासरावांची खास ओळख. त्यांच्या अनेक आठवणी त्यांच्या समर्थकांच्या, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आजही कायम आहेत. आजच्या राजकीय परिस्थितीत विलासराव हवे होते, असं म्हणणारेही खूप जण आहेत.
देशमुख परिवाराने विलासरावांच्या असंख्य आठवणी जपून ठेवल्या आहेत. मांजरा कारखान्यावर भव्य स्मृतिस्थळ उभारले आहे. दरवर्षी या दिवशी त्यांच्या बाभळगाव येथील समाधीस्थळावर जयंती साजरी केली जाते. यावर्षी लॉकडाऊनमुळे ते शक्य नाही. देशमुख कुटुंबीयांनी घरच्या घरीच विलासरावांच्या स्मृतींना वंदन केलं. अभिनेता रितेश देशमुख यांनी एका हृदयस्पर्शी व्हिडीओतून चाहत्यांना आपल्या वडिलांची भेट घडवली आहे.
जॅकेट न्याहाळत असताना...
विलासरावांचं जॅकेट न्याहाळत असताना त्यातून त्यांचा हात बाहेर येतो आणि रितेशच्या डोक्यावरून मायेनं फिरतो, त्याची पाठ थोपटतो, असा एक क्रिएटिव्ह व्हिडीओ रितेशनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाप-लेकाची ही गळाभेट पाहताना मन आणि डोळे भरून येतात. या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.