रतिलाल बोरीसागर यांना ‘कवी नर्मद साहित्य पुरस्कार’;पुरस्कार सोहळा १० आॅक्टोबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:47 AM2017-10-08T00:47:40+5:302017-10-08T00:47:59+5:30
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७ च्या नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङ्मय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७ च्या नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङ्मय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
२०१७ चा ‘कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक रतिलाल बोरीसागर यांना घोषित झाला आहे.
‘साहित्य पुरस्कार’ साहित्यिक आबिद सुरती, ‘कला पुरस्कार’ गौतम जोशी, ‘पत्रकारिता पुरस्कार’ शिरीष मेहता व ‘संस्था पुरस्कार’ भवन्स कल्चरल सेंटर, अंधेरी यांना घोषित झाला आहे.
१० आॅक्टोबरला सायंकाळी ७ वाजता गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्याभवन येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार असून या सोहळ््यास उद्योगमंत्री सुभाष देसाई, डॉ. जे. जे. रावल, खा. अरविंद सावंत, आ. मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणा-या वाङ्मय पुरस्कारामध्ये ‘चुनीलाल मडिया पुरस्कार’ (नवलकथा) प्रथम पुरस्कार श्रीमती वर्षा अडालजा आणि श्रीमती सोनल परीख यांना संयुक्तरीत्या घोषित करण्यात आला आहे.
द्वितीय पुरस्कार श्रीमती मालती कापडिया यांना जाहीर झाला आहे. याचप्रमाणे नाटक विभागासाठी देण्यात येणारा ‘प्रबोध जोशी पुरस्कार’ उत्तम गडा यांना घोषित झाला आहे. तसेच निबंध विभागातील ‘वाडिलाल डगली पुरस्कार’ हा दीपक मेहता आणि श्रीमती तारिणीबहेन देसाई यांना संयुक्तरीत्या घोषित झाला आहे.