मुंबई : महाराष्ट्रात अंधश्रद्धेला आळा घालणारा कायदा झाला असला अंधश्रद्धेचे भूत सर्वसामान्यांच्या मानगुटीवर अजूनही बसलेलेच आहे. याचेच उदाहरण मुंबईतील सुशिक्षित वस्तीत पाहायला मिळाले. पूर्व द्रूतगती मार्गावरील अपघात टाळण्यासाठी येथील उच्चशिक्षितांनी चक्क हनुमान चालिसाचे पठण केले. समाज कुठल्या दिशने चालला आहे, हा प्रश्न या प्रकाराकडे पाहून पडतो.विक्रोळीमध्ये प्रमुख तीन जंक्शन आहेत. टी जंक्शन आणि गोदरेजच्या दोन जंक्शनचा यामध्ये समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांत येथे ५७ अपघात झाले. यामध्ये ९ जणांचा बळी गेला तर उर्वरित जखमी झाले. या अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी या मार्गालाच धोकादायक ठरवले. या अपघातांसाठी अनैसर्गिक कारणे असल्याचा दावा या ठिकाणी उपस्थित असलेल्या कुटुंबांनी केला. पेशाने व्यावसायिक असलेले योगेश शाह यांचा मुलगा झील या अपघाताचा बळी ठरला होता. वाहनासमोर कुत्रा आडवा आल्याने झीलचा अपघात झाला. अपघातानंतर १४ दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शाह कुटुंबीय पूर्णत: कोलमडून गेले. झीलच्या ‘पीस’ या संस्थेच्या माध्यमातून आज या मार्गावर अपघातात जखमी आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांनी या मार्गावर हनुमान चालिसाचे पठण केले. यामध्ये उच्चशिक्षित कुटुंबे सहभागी झाली होती. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. उच्च शिक्षितांनी केलेले हे कर्मकांड योग्य आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे. हेतू चांगला, कृतीत विसंगती : विक्रोळीच्या ‘त्या’ जागेवर पुन्हा अपघात होऊ नये, हा शहा कुटुंबीयांचा हेतू चांगला आहे. मात्र पूजाअर्चा करून अपघात टळत नसतात, त्यामुळे शहा कुटुंबीयांनी केलेल्या कृतीतील विसंगती लक्षात चुकीचीच आहे. शहा कुटुंबीयांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे त्यांची मन:स्थिती समजून घ्यायली हवी. शिवाय शासनाच्या संबंधित विभागाने अपघात स्थळाची भेट घेऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून तेथे तो मार्ग सुस्थितीत आहे का, हे पाहिले पाहिजे. गाडीला लिंबू-मिरची बांधून अपघात टळत नसतात. त्यासाठी वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित वाहतुकीविषयी जनजागृती आवश्यक आहे. -कृष्णा चांदगुडे, कार्यकर्ता, अंनिस
पूर्व द्रुतगती महामार्गावर कर्मकांड
By admin | Published: June 28, 2015 2:35 AM