ऋतुजा लटके यांनी राजीनाम्यात घातली अशी अट, ज्यामुळे अडकला त्यांचा राजीनामा, समोर आली अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 01:50 PM2022-10-12T13:50:06+5:302022-10-12T13:50:53+5:30
Andheri East Assembly By-Election : उमेदवारी निश्चित केलेल्या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने मंजूर न केल्याने शिवसेना आणि राज्य सरकार आमने-सामने आलेले आहे. दरम्यान, ऋतुजा लटके यांनी राजीनाम्यात घातलेल्या एका अटीची चर्चा सध्या होत आहे.
मुंबई - महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय उलथापालथींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व मतदारसंघात होणारी निवडणूक ही उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबतच भाजपा आणि शिंदे गटासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) न उमेदवारी निश्चित केलेल्या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने मंजूर न केल्याने शिवसेना आणि राज्य सरकार आमने-सामने आलेले आहे. दरम्यान, ऋतुजा लटके यांनी राजीनाम्यात घातलेल्या एका अटीची चर्चा सध्या होत आहे.
रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. मात्र ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. पण बरेच दिवस होऊनही लटके यांचा राजीनामा पालिकेने स्वीकारलेला नाही.
राजीनामा देण्यासाठी दिलेल्या राजीनामा पत्रात ऋतुजा लटके यांनी घातलेल्या एका अटीमुळे हा राजीनामा स्वीकारला गेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. जर मी निवडणुकीत पराभूत झाले, तर मला पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत घ्यावे, अशी अट ऋतुजा लटके यांनी या राजीनामा पत्रात घातल्याचे सांगण्यात येत आहे.
कुठल्याही राजीनाम्यात अशी अट असू शकत नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी पालिकेच्या प्रशासनाला दिला. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय झाला नव्हता. त्यानंतर आता ऋतुजा लटके यांनी सुधारित अर्ज दिल्याचे सांगण्यात .येत आहे. तसेच त्यात कुठलीही अट नसल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र हा अर्ज मूळ राजीनाम्यात सुधारणा करणारा अर्ज आहे की नवा अर्ज याबाबतही आता पेच निर्माण होऊ शकतो. कारण जुन्या अर्जावरील तारखेनुसारच नियमानुसान नोटिस कालावधी पूर्ण होत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, ऋतुजा लटके यांना आपल्या गटात आणण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. मात्र आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ऋतुजा लटके ह्या आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरकारच्या दबावामुळे प्रशासन त्यांचा राजीनामा स्वीकारत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.