‘रिव्हर रेग्युलेशन झोन’ धोरण रद्द करणारेच, नदी वाचवा म्हणतात! - सचिन सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:18 AM2018-03-04T02:18:33+5:302018-03-04T02:18:33+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच नद्यांचा विकास व संरक्षणासाठी काँग्रेस सरकारने तयार केलेले ‘रिव्हर रेग्युलेशन झोन’चे धोरण रद्द करून रेड झोनमधील उद्योगांना नदीक्षेत्रात काम करण्याची परवानगी दिली. मात्र तेच मुख्यमंत्री नदी वाचविण्यासाठी गाणे गात आहेत, त्यांचे नद्यांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच नद्यांचा विकास व संरक्षणासाठी काँग्रेस सरकारने तयार केलेले ‘रिव्हर रेग्युलेशन झोन’चे धोरण रद्द करून रेड झोनमधील उद्योगांना नदीक्षेत्रात काम करण्याची परवानगी दिली. मात्र तेच मुख्यमंत्री नदी वाचविण्यासाठी गाणे गात आहेत, त्यांचे नद्यांबद्दलचे प्रेम बेगडी आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.
मुंबईतील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जनजागृती करण्याचा देखावा ध्वनिचित्रफितीत आहे. मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता व मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर व इतर अधिकाºयांनी त्यात सहभागी होऊन भारतीय तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी. अधिकाºयांची कारकिर्द धोक्यात आणल्याबद्दल नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सावंत म्हणाले, काँग्रेसच्या १० प्रश्नांवर भाजपा आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या उत्तराने संशय अधिक वाढला. सदर खुलाशान्वये या ध्वनिचित्रफितीमध्ये सहभागी झालेल्या अधिकाºयांनी स्वेच्छेने होकार दिल्याचे म्हटले आहे. परंतु अजोय मेहता आणि दत्ता पडसलगीकर हे अनुक्रमे भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी असल्याने त्यांनी अखिल भारतीय नागरी सेवेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केले आहे. शासनाची पूर्वपरवानगी न घेता कोणतेही प्रायोजित माध्यम, सरकारतर्फे जाहीर केलेला परंतु बाह्य एजन्सीने बनवलेला किंवा खासगी संस्थेने बनवलेल्या रेडिओ, टेलिव्हिजन वा अन्य माध्यमांतील ध्वनिचित्रफितीत त्यांना सहभागी होता येत नाही, त्यावरही खुलासा होणे अपेक्षित असल्याचे सावंत म्हणाले.
संपूर्ण ध्वनिचित्रफितीत ‘टी सीरीज’चा लोगो आहे. ही कंपनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांशी व्यावसायिक संबंध ठेवून आहे, हे यापूर्वी टी सीरीजने प्रदर्शित केलेल्या काही ध्वनिचित्रफितींवरून दिसून आले आहे. रिव्हर मार्च संस्थेचे विक्रम चोगले भाजपाचे कार्यकर्ते असून त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती, असेही सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा
मुख्यमंत्री कार्यालयाने खुलासा करताना म्हटले आहे की, ध्वनिचित्रफितीची निर्मिती रिव्हर मार्च सामाजिक संस्थेने केली. सामाजिक भावनेतून मुख्यमंत्री आणि अन्य अधिकाºयांनी त्यांच्या विनंतीला होकार दिला. स्वच्छता, हगणदारीमुक्तीसारख्या व्हीडीओंमध्ये अधिकाºयांनी यापूर्वीही सहभाग घेतला आहे.
आयएएस अधिकाºयांच्या आदर्श आचारसंहितेत लोकोपयोगी कार्यासाठी पुस्तक लिहिणे, सहभाग घेणे आदींसाठी जर तो व्यावसायिक उपक्रम नसेल तर पूर्वपरवानगीची गरज नसल्याचे नमूद आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांनीही अभियानाला पाठिंबा दिला. त्यानंतर केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यापर्यंत पाठपुरावा झाला. त्यांनी १८ सप्टेंबरला एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहून उपक्रमाला मदत करण्याचे आवाहन केले.