मुंबई : ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याची विशेष न्यायालयाने जामिनावर सुटका केली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने त्याला नार्कोटिक्स ड्रग्स ॲण्ड सायकीट्रॉफीक सबस्टान्स ॲक्ट अंतर्गत सप्टेंबरमध्ये अटक केली. अटकेनंतर तीन महिन्यांनी बुधवारी विशेष एनडीपीएस न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी त्याची ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका केली.
एनसीबी अधिकाऱ्यांकडे दिलेला कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकत नाही, असा निकाल अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. या निकालाचा आधार घेत शोविकने विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. आपल्याला या प्रकरणात नाहक गोवल्याचा दावा त्याने केला.
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक सुशांतला ड्रग्ज पुरवायचे. त्यासाठी पैसेही पुरवायचे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास अनेक दृष्टिकोनातून तपास यंत्रणा करीत आहे. या प्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या कर्मचाऱ्यांनाही अटक केली होती. या सर्वांची सध्या जामिनावर सुटका झाली आहे.