मुंबई : सुशांतसिंग राजपूत ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयात मंगळवारी जामीन अर्ज दाखल केला.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने रियाला ९ सप्टेंबर रोजी अटक केली. विशेष एनडीपीएस न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळत तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
विशेष न्यायालयाने मंगळवारी तिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. रियाचा भाऊ शोविक व सुशांतला मदत करणाऱ्या पाच जणांना एनसीबीने ५ सप्टेंबर रोजी अटक केली. त्यात सॅम्युअल मिरांडा याचाही समावेश आहे. या सर्वांवर सुशांतसाठी ड्रग्स खरेदी केल्याचा व ते विकत घेण्यासाठी पैसे पुरविल्याचा आरोप आहे.
११ सप्टेंबर रोजी रिया, शोविक यांच्यासह पाच जणांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यांनतर लगेचच मिरांडा, दीपेश सावंत, ड्रग विक्रेता अब्दुल बाशित परिहार यांनी विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
या तिघांच्या जामीन अर्जावर गेल्याच आठवड्यात न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यांनी २९ सप्टेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली. रिया व शोविक यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीही न्या. कोतवाल यांच्यापुढे बुधवारी होण्याची शक्यता आहे.