मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का? असं म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलिष्काचं आणखी एक खड्ड्यांवरचं गाणं सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. सैराट सिनेमातील झालं झिंग झिंगाट गाण्याच्या धर्तीवर मलिष्कानं 'गेली गेली मुंबई खड्ड्यात' हे गाणं तयार केलं होत. त्यानंतर, मलिष्कानं आता 'चांद जमिन पर' या टायटलने नवं गाणं प्रदर्शित केलं आहे.
भारत चंद्रयानातून चंद्रावर पोहोचला अन् चंद्रही जमिनीवर उतरला असे म्हणत मुंबईतील खड्ड्यांची समस्या मलिष्कानं मांडली आहे. अवघ्या काही तासांच्या पावसानं मुंबईची होणारी तुंबई, त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे होणारे हाल, मलिष्कानं या नव्या गाण्यातून मांडले आहेत. मलिष्काने गाणं आपल्या my Malishka या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केलं आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काही वेळातच या गाण्याला मोठ्या प्रमाणआत लाईक आणि शेअर करण्यात येत आहे. मलिष्कानं या गाण्यातून पुन्हा एकदा मुंबई महापालिका आणि बांधकाम विभागावर टीका केली आहे. तसेच, मुंबईतील खड्ड्यांचं आणि आपलं 7 जन्माचं नात आहे, असेही मलिष्कानं म्हटलंय. चांद जमीन पर असं या गाण्याचं टायटल असून यावेळी मलिष्का चक्क रस्त्यावर उतरली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत तिनं हे गाणं शुट केलंय. त्यामध्ये नववधुच्या वेशात मलिष्का दिसत असून तिच्या हातात चाळणी आहे. चाळणीतून ती खड्ड्यांना आणि चंद्राला पाहाताना दिसत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मलिष्कानं उपहासात्मक गाण्यातून बीएमसीवर निशाणा साधला होता. त्या गाण्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं मलिष्कावर जोरदार टीका केली होती. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या. त्यामुळे, आता मलिष्काच्या खड्ड्यांबद्दलच्या गाण्याचे कसे पडसाद उमटणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.