लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेडिओ जॉकी तरुणीचा पाठलाग करत फसवणुकीच्या प्रयत्नात असलेल्या विजय अलेक्झांडर याला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत त्याने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ येथील ६७ महिलांना अश्लील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.विवाह नोंदणी संकेतस्थळावरून तक्रारदार आरजे तरुणी विजयच्या संंपर्कात आली. तिने बीबीएमचे शिक्षण पूर्ण केले आहे. खोटी माहिती देत त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनंतर तिच्या बँकेविषयी तो अधिक माहिती घेऊ लागल्याने तरुणीला संशय आल्याने तिने संपर्क तोडला. मात्र समाजमाध्यमे आणि विविध अॅपद्वारे विजयने तक्रारदार तरुणीचा पाठलाग सुरूच ठेवला. अश्लील छायाचित्रे(मॉर्फ केलेली) व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेतल्याने सायबर पोलिसांनी विजयला आंध्र प्रदेशमधून अटक केली आहे.टेक्नोसॅव्ही असलेला विजय अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवनवीन अॅप हाताळीत असे. त्याने डेटिंगसह, लघुसंदेश किंवा संपर्क साधण्यासाठीची अनेक अॅप विकत घेतली होती. त्याने टार्गेट केलेल्या काही तरुणींचे तपशील त्याने विवाह नोंदणी संकेतस्थळावरून घेतले होते. त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून फसवणुकीचा प्रयत्न केला. तर काहींशी मैत्री करून मानसिक छळ सुरू केला. यातील एका तरुणीची छायाचित्रे विजयने प्रसिद्ध डेटिंग अॅपवर व्हायरलदेखील केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.यात आणखी काही तरुणींची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. त्यात महाराष्ट्रतून दोन तरुणी तक्रारीसाठी पुढे आल्या आहेत. या प्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरजे तरुणीचा पाठलाग करणाऱ्या विकृताने ६७ महिलांना केले टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:47 AM