‘आरके’ स्टुडिओला १७५ कोटी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 02:47 AM2018-10-28T02:47:51+5:302018-10-28T06:44:00+5:30
विक्रीसाठी चर्चा सुरू; दिवाळीनंतर होणार कागदपत्रांची नोंदणी
मुंबई : हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेल्या चेंबूरमधील ‘आरके’ स्टुडिओच्या विक्रीसाठी कपूर कुटुंबीयांनी पावले उचलली आहेत. स्टुडिओच्या परिसरातील सव्वादोन एकर जागेसाठी १७५ कोटी रुपये मिळणार असल्याची अपेक्षा आहे, असे ‘आर के’च्या सूत्रांनी सांगितले. दिवाळीनंतर स्टुडिओच्या विक्रीसंदर्भातील कागदपत्रांची नोंदणी करण्यात येणार आहे.
स्टुडिओतून मिळणारे उत्पन्न घटल्याने, कपूर कुटुंबीयांनी तो विकण्याचा निर्णय घेतला होता. कपूर कुटुंबीयांची सध्या मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपनीशी विक्रीसंदर्भात बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. जवळपास ७० वर्षांहून अधिक काळ उभ्या असलेल्या या स्टुडिओतून मिळणारे उत्पन्न आणि त्याचा देखभालीचा खर्च यात मोठी तफावत असल्याने, कपूर कुटुंबीयांनी तो विकण्याचा निर्णय घेतला. सध्या स्टुडिओचे मालकी हक्क ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्याकडे आहेत. दोन दिवसांपासून रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांनी पुन्हा चर्चा सुरू केली आहे. ही बोलणी सकारात्मक झाली आहे.
नफ्याची विभागणी
राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर, मुले रणधीर, ऋषी आणि राजीव व मुलगी रितू नंदा आणि रिमा जैन यांनी स्टुडिओ विकण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. विक्रीतून झालेल्या नफ्याची सर्वांमध्ये विभागणी होणार आहे.