आरएमसी प्लांट्स रडारवर! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावल्या दहा प्रकल्पांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 10:05 AM2023-11-06T10:05:24+5:302023-11-06T10:05:29+5:30
दिल्लीतील वायूप्रदूषणाची पुनरावृत्ती मुंबईत होऊ नये यासाठी एमपीसीबीने वेगाने पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारावी, धुलिकणांचे प्रमाण घटावे यासाठी मुंबई महापालिकेसह सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहेत. बांधकामांना ताकीद देण्याबरोबरच रेडी मिक्स प्लांट्सनाही (आरएमसी) चाप लावण्याचे काम सुरू असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दहा प्लांट्सना नोटिसा बजावल्या आहेत. तर तीन कंपन्यांना काम तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीतील वायूप्रदूषणाची पुनरावृत्ती मुंबईत होऊ नये यासाठी एमपीसीबीने वेगाने पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्सना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणाचे काम मंडळाने हाती घेऊन ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हवेच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवून आहे.
१४ ठिकाणांवर बसविण्यात आलेल्या यंत्रणेद्वारे प्रदूषणाचे प्रमाण मोजण्याचे काम केले जात आहे. शिवाय हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी मंडळाच्या वतीने ७ वाहनेही तैनात करण्यात आली आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेसह राज्यभरातील सर्वच प्राधिकरणांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरएमसी प्लांट्स म्हणजे?
सर्वाधिक प्रचलित असलेले काँक्रिटचे हे रूप आहे. यामध्ये स्थानिक कारखान्यांमध्ये काँक्रीटसाठी लागणारे सर्व साहित्य विशिष्ट प्रमाणामध्ये वजन केल्यावर एकत्रित करून, त्यानंतर फिरत्या ड्रमच्या ट्रकमध्ये भरून बांधकामस्थळी पुरविले जाते.
रेडी-मिक्स काँक्रिट हे बॅच प्लांटमध्ये तयार केले जाते. गरजेनुसार नंतर वापरण्यासाठी तयार जॉब साइटवर वितरित केले जाते. रेडी मिक्स काँक्रीट दोन प्रकारे वितरित केले जाते.
हेच ते प्रकल्प...
१) एस.पी. सिंगला कंस्ट्रक्शन
२) जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस लिमिटेड
३) जेएसडब्ल्यू ग्रीन सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड
४) रेसॉनंट रिलॉटर्स प्रोजेक्टस लिमिटेड
५) लोणावळा कन्सट्रक्शन कंपनी
६) हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (मुंबई रिफायनरी)
७) टाटा पॉवर को. लिमिटेड (थर्मल पॉवर स्टेशन, माहुल)
८) ॲगिस लॉजिस्टिक, माहूल
९) सीलॉर्ड कंटेनर्स लिमिटेड, अंबापाडा
१०) राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड
काम बंद करण्याच्या नोटिसा
१) सिएट टायर, भांडूप
२) ललित नागपाल (रेडी मिक्स काँक्रीट प्लँट)
३) जेएसडब्ल्यू ग्रीन सिमेंट प्रा.लि
(रेडी मिक्स काँक्रीट प्लँट)
प्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे...
मोजमापन यंत्रणेचा अहवाल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मागणीनुसार तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावा.
सतत फॉगिंग केले जावे. जेणेकरून हवेत पसरणाऱ्या धूलिकणांपासून बचाव होण्यास मदत होईल.
पूल आणि उड्डाणपूल यांसारख्या सर्व कामांच्या ठिकाणी किमान २० फुटांचे बॅरिकेडिंग असावे.
जमिनीवरील मेट्रोची सर्व कामे २० फूट उंचीच्या बॅरिकेडिंगने झाकावीत.
रात्री उशिरा बांधकाम आणि विध्वंस कचरा, मलब्याची अवैध डम्पिंग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त यांनी विशेष पथके तैनात करावीत.
हवा गुणवत्ता देखरेख केंद्रांची नियमितपणे महापालिका प्राधिकरणाद्वारे तपासणी करावी.