खलील गिरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते मांडवा या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या रो पॅक्स सेवेला आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण झाली असून, ही सेवा फेब्रुवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल येथून अलिबागजवळील मांडवा येथे जाण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेसाठी आवश्यक असलेली जेटी उभारण्यासह इतर बाबींची पूर्तता झाली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी आता जहाजाची प्रतीक्षा केली जात आहे. जहाज आल्यानंतर महिन्याभरात सेवा सुरू करण्यात येईल.या सेवेसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डातर्फे कंत्राट दिले असून, जानेवारी अखेरीस जहाज मुंबईत दाखल होईल. त्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारीत ही सेवा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केला. रो पॅक्स सेवेद्वारे जहाजात वाहने घालून ती वाहने मुंबई ते मांडवा दरम्यान ने-आण करता येतील.यासाठी आवश्यक असलेल्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. या जहाजाद्वारे एका वेळी १२० चारचाकी वाहने व १८ बस किंवा ट्रकची वाहतूक या मार्गावर करता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी जहाज थांबविण्यासाठी १०० मीटर बर्थिंग विभाग वापरला जाणार आहे.रो पॅक्स म्हणजे नेमके काय?रो पॅक्स म्हणजे चारचाकी छोटे वाहन, ट्रक, बस जहाजात ठेवून त्याची वाहतूक करण्यात येते. रो पॅक्स सेवेद्वारे जहाजामध्ये वाहने घालून ती वाहने मुंबई ते मांडवा दरम्यान ने-आण करता येणे शक्य होईल. या सेवेमुळे मुंबई ते मांडवा जाण्यासाठी सध्या रस्ते मार्गाने लागणाºया वेळेपेक्षा किमान अडीच तासांची बचत होईल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केला. या सेवेचा लाभ दरवर्षी किमान अडीच ते तीन लाख प्रवासी घेऊ शकतील. रस्तेमार्गे होणाºया वाहतुकीवरील ताण काही प्रमाणात कमी होईल व प्रवाशांनाही वाहतूककोंडीत अडकण्याऐवजी जहाजाद्वारे थेट मांडवा पोहोचता येईल.
रो पॅक्स सेवा दोन महिन्यांत सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 6:06 AM