Join us

मुंबईतून गाडी बोटीतून न्या व अलिबागला सव्वा तासात पोचा - एप्रिलपासून सेवा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 12:22 PM

जलप्रवासाला चालना देण्याच्या उद्देशातून भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो - रो सेवा (रोल ऑन रोल ऑफ) सुरू करण्याचे सरकारने निश्चित केले असून त्यासाठी जलवाहतूक सेवा देणाऱ्या कंपनीची नियुक्तीही करण्यात आली आहे

ठळक मुद्दे350 प्रवासी व 40 गाड्या एकाचवेळी वाहून नेण्याची क्षमता असलेली ही रो - रो बोट सेवा 2018च्या एप्रिल महिन्यात कार्यान्वित होणारहा प्रकल्प महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट व सिडको संयुक्तपणे राबवत आहेतसरकारी आकडेवारीनुसार मुंबई अलिबाग सागरी मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वर्षाला 1.8 कोटी इतकी प्रचंड आहे

मुंबई - जलप्रवासाला चालना देण्याच्या उद्देशातून भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो - रो सेवा (रोल ऑन रोल ऑफ) सुरू करण्याचे सरकारने निश्चित केले असून त्यासाठी जलवाहतूक सेवा देणाऱ्या कंपनीची नियुक्तीही करण्यात आली आहे. भाऊच्या धक्क्यावर बोटीत गाड्या चढवायच्या नी 30 मिनिटात मांडव्याला पोचायचे व तिथून पाऊण तासात गाडी घेऊन अलिबाग गाठायचे अशी ही योजना आहे. कोकणामध्ये तसेच केरळमध्ये अनेक खाड्या याच पद्धतीनं पार केल्या जातात, ज्यामुळे लांबचे रस्ते टाळता येतात, वेळ वाचतो व पेट्रोलचीही बचत होते.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार 350 प्रवासी व 40 गाड्या एकाचवेळी वाहून नेण्याची क्षमता असलेली ही रो - रो बोट सेवा 2018च्या एप्रिल महिन्यात कार्यान्वित होणार आहे. भाऊचा धक्का ते मांडवा हा लोकप्रिय प्रवासी मार्ग आहे. तसेच गेट वे ऑफ इंडिया वरूनही प्रवासी सेवा आहे. मात्र, आता आपापल्या गाड्याही प्रवाशांना बोटीवरून नेता येणार आहेत, आणि पुढील प्रवास करता येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट व सिडको संयुक्तपणे राबवत आहेत.

सध्या या मार्गांवर प्रचंड मागणी असून नवीन सेवा कोकणातल्या प्रवासाची सगळी गणितं बदलवेल असं सांगण्यात येत आहे. भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर 16 किलोमीटर आहे तर पुढे मांडवा ते अलिबाग हे अंतर 45 किलोमीटर आहे.  सध्या रस्त्याने अलबागला जायचं तर मुंबईहून चार तासाच्या आसपास वेळ लागतो. त्यामुळे हजारो प्रवासी सागरी मार्गालाच पसंती देतात. सरकारी आकडेवारीनुसार मुंबई अलिबाग सागरी मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वर्षाला 1.8 कोटी इतकी प्रचंड आहे. त्यामुळे या मार्गाला प्रचंड मागणी असल्याचे दिसून येते.

रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करावी यासाठी सरकार जलवाहतुकीचे विविध पर्याय वापरात आणण्याचा विचार करत आहे. हा त्यातलाच एक प्रयोग आहे. गोराई, मालवण व भाइंदर येथेही जेटींना मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर भाऊचा धक्का ते नवी मुंबई व नवी मुंबई ते मांडवा दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

टॅग्स :मुंबईरायगडजलवाहतूक