भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवा सुरु; मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 01:33 PM2020-03-15T13:33:29+5:302020-03-15T14:57:18+5:30
भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे.
मुंबई: भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल. राज्याच्या किनारपट्टीमध्ये अशी जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे. कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही, असे शनिवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र कार्यक्रमाच्या औपचारिकतेसाठी न थांबता प्रवाशांच्या सोयीसाठी लगेच ही सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या सेवेस त्यांनी आज आपल्या शुभेच्छाही दिल्या.
भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो-रो सेवा सुरू करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली अशा सर्वांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले धन्यवाद. ही सेवा महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल- मुख्यमंत्री pic.twitter.com/KoxJgSAErx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 15, 2020
या सेवेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून मांडवा जेट्टी येथे 150 कोटी रुपये खर्चून सुविधा निर्माण केल्या आहेत. नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर येथून देखील लवकरच जलवाहतूक सुरू करण्याची तयारी आहे. भाईंदर ते डोंबिवली अशा जलवाहतुकीच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळून दोन वर्षांत तीही सेवा सुरू होईल. एकूणच जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन व रोजगार वाढविला जाईल, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.
भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर 19 किमी असून या जलवाहतुकीने एक तासात कापता येते. रस्त्याने जाण्यासाठी चार तास लागतात. रो पॅक्सची क्षमता एकावेळी 500 प्रवासी आणि 145 वाहने नेण्याची आहे
रो रो सेवेची माहिती
भाऊचा धक्का ते मांडवा रो -पॅक्स सेवेमुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत करण्यात आलेले असून मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचे बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत करण्यात आले आहे. केंद्र शासनाची सागरमाला योजना आणि राज्य शासनाकडून 50-50 टक्के या प्रमाणात निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानच्या रो-पॅक्स सेवेसाठी एमटूएम जहाज मुंबईत दाखल झाले आहे.
Bhaucha Dhakka, Mazgaon to Mandwa Ro-Ro jetty service has begun.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 15, 2020
Here are some benefits 👇🏼
✅Major Boost to water transportation
✅Ease of travel
✅Comfortable for citizens
✅Time saving
✅Cost effective
✅Boost to Industries & Tourism in Raigad pic.twitter.com/iw6r4AJ1FD