मुंबई-ठाणे-नवी मुंबई-वसई-मालवण जलवाहतुकीसह रो-रो सेवा लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:59 AM2019-02-05T06:59:19+5:302019-02-05T06:59:32+5:30
मुंबई, ठाणे, वसई, बेलापूर, पालघर ही शहरे केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतूकमार्गे जोडून त्यातून प्रवासी वाहतुकीसह रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
- नारायण जाधव
ठाणे : मुंबई, ठाणे, वसई, बेलापूर, पालघर ही शहरे केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतूकमार्गे जोडून त्यातून प्रवासी वाहतुकीसह रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या दुचाकींसह चारचाकी बोटीतून मुंबईतील गोराई, मनोरी, बोरीवली, ठाण्याचे घोडबंदर, पालघरचे वसई, खारवाडेश्वरी, रायगडच्या काशीद बंदरासह थेट सिंधुदुर्गाच्या मालवणपर्यंत नेणे सोपे होणार आहे. यासाठीच्या २३४ कोटी २४ लाख रुपयांच्या आराखड्यापैकी आता पुन्हा १५ कोटी ४० हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.
गेल्या महिन्यात महाराष्ट्र शासनाने सागरमालाअंतर्गत उरणचे करंजा बंदर, अलिबागचे रेवस बंदर आणि मुरूडनजीकच्या काशीद बीच येथे रो-रो सेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर आता पुन्हा १२ ठिकाणी प्रवासी आणि रो-रो जेट्टी बांधण्यासाठी २३४ कोटी २४ लाख रुपयांच्या आराखड्यातील १५ कोटी ४० लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. यात १२ ठिकाणच्या प्रवासी आणि रो-रो जेट्टींसह नौकानयन मार्गातील गाळ काढण्याच्या कामाचाही समावेश असून त्यासाठी १८.१२ कोटींपैकी चार कोटी ५३ लाख खर्च करण्यास मंजुरी दिली आहे.
आतापर्यंत १९.८६ कोटी खर्च
सागरमाला जलवाहतूक आराखड्यास मान्यता दिल्यानंतर गेल्या वर्षी २६ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाने मेरीटाइम बोर्डास दिलेला असून त्यातील १९ कोटी ८६ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले.