रस्ते अपघातास पायाभूत सुविधांमधील दोष कारणीभूत; तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:52 AM2020-02-25T00:52:16+5:302020-02-25T00:52:34+5:30
सदोष सुविधांमुळे ९० टक्के दुर्घटना; कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्याची गरज
- नितीन जगताप
मुंबई : भारतात दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे, पण जे अपघात होतात, त्यामध्ये ९० टक्के अपघातास हे पायाभूत सुविधांमधील दोष कारणीभूत आहेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
याबाबत सेव्ह लाइफ फाउंडेशनचे संस्थापक पीयूष चौधरी म्हणाले, आपल्या देशात रस्ते अपघाताचा योग्य प्रकारे तपास होत नाही. त्यामुळे रस्त्यांतील दोषामुळे जे अपघात होतात, ते समोर येत नाहीत. आम्ही ५००हून अधिक दुर्घटनांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये प्रत्येक घटनेत काही ना काही अभियांत्रिकी दोष होते. अपघातामध्ये जखमी होण्याचे ९० टक्के कारण हे पायाभूत सुविधा आहे.
केरळ येथे नुकताच ट्रक आणि बसचा अपघात झाला, यात १९ जणांचा मृत्यू झाला, पण हा अपघात झाला, तेथे कोणतेही बॅरिकेट्स नव्हते. याशिवाय खराब रचनेमुळे कित्येक अपघात होतात, तसेच अनेकदा महामार्गावर चुकीच्या ठिकाणी वळण असते. त्यामुळे चालकांना वाहन वळविण्यास अडचण येऊन अपघात होतो, तसेच नवीन मोटार कायद्यानुसार अभियांत्रिकी दोष असेल, तर अभियंता आणि कंत्राटदार यांच्याकडून दंड आकारण्याची तरतूद आहे, परंतु ते पुरेसे नाही, त्यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशीही त्यांनी मागणी केली.
रस्त्याचे योग्य मानांकन भारत सरकारने जाहीर केले पाहिजेत. इंडियन रोड काँग्रेसचे मानांकनानुसार काम चालते, परंतु ते खूप जुने आहेत. ते आजची वाहने आणि वाहतुकीस योग्य नाहीत. सरकारने लहान आणि मोठे रस्ते यांच्यासाठी मानांकन ठरवायला हवे. ते मानांकन न पाळणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, असे पीयूष चौधरी यांनी सांगितले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १५ प्रकारचे अभियांत्रिकी दोष आढळले होते. एमएसआरडीसीने त्यामध्ये सुधारणा केल्या आहेत. पायाभूत सुविधांमुळे जे अपघात होत होते, त्यामध्ये ८० टक्क्यांनी घट झाली आहे. रस्त्यातील १५ दोषांमधील ११ दोष पूर्णपणे काढण्यात आले आहे. ४ दोष आहेत, त्यामध्ये घाटात रस्त्यालगत अतिरिक्त जागा नाही. त्यामुळे मिसिंग लिंक प्रोजेक्टअंतर्गत अतिरिक्त रस्ता बनविण्यात येत आहे.
- पीयूष चौधरी, संस्थापक, सेव्ह लाइफ फाउंडेशन
रस्त्याची रचना चांगली हवी
अपघात रोखण्यासाठी रस्त्याची रचना चांगली करायला हवी. रस्त्यात वेगमर्यादा फलक लावले पाहिजेत, तसेच पादचारी रस्ता ओलांडत असतील, तर तसा फलक लावून रस्त्यावर मार्किंग करणे आवश्यक आहे. त्याकडे वाहन चालक दुर्लक्ष करत असतील, तर गतिरोधक लावायला हवेत, असे मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे सल्लागार डॉ. शंकर विश्वनाथ यांनी सांगितले.