बांधला जातोय रेक्लमेशन करून रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 03:02 AM2021-01-11T03:02:53+5:302021-01-11T03:03:15+5:30
देशात पहिलाच प्रयोग : शास्त्रीय पद्धतीने केले जातेय रस्ता बांधणीचे काम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमेरिकेत पॅसिफिक कोस्ट हायवे व हना हायवे, ऑस्ट्रेलियात ग्रेट ओसीएन रोड, अटलांटिक ओसीएन रोड-नॉर्वे, तसेच कॅनडा, फ्रान्स, इटली, ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी कोस्टल रोड बांधले गेले आहेत. मात्र शास्त्रीय पद्धतीने रेक्लेमेशन करून यापूर्वी रस्ता बांधण्याचा प्रकल्प देशात झाला नाही. शास्त्रीय पद्धतीने रिक्लेमेशन करण्याची प्रक्रिया बहुतेक पहिल्यांदाच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे.
मुंबईच्या विकास आराखड्यात १९६७ पासून १९९१ पर्यंत पूर्व द्रुतगती व पश्चिम द्रुतगती मार्गांची रचना प्रस्तावित करण्यात आली. मुंबईच्या मंजूर झालेल्या २०३४ च्या विकास आराखड्यात किनारी रस्त्याचे प्रयोजन करण्यात आले. २०११ साली शासनाने दक्षिण मुंबईपासून पश्चिम उपनगराच्या कांदिवलीपर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत करून वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी पर्यायी कोस्टल रोडचा अभ्यास करण्यास तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त तांत्रिक समिती ३० जून २०११ रोजी गठित केली. २९ डिसेंबर २०११ रोजी या समितीने कोस्टल रोडसंबंधी विविध पर्याय असलेला अहवाल शासनास सादर केला.
संयुक्त तांत्रिक समितीने याप्रमाणे ३५.६ किमी लांबीच्या कोस्टल रोड - समुद्रकिनारी रेक्लेमेशन (भराव), पूल, खांबावरील पूलरस्ता, बोगदे असा अंतर्भाव असलेला किनाऱ्यालगतच्या कोस्टल रोडची शिफारस शासनास केली. समितीने शिफारस करताना वाहतूक समस्येवर पर्याय मिळेल आणि अत्यंत गरज असलेल्या मनोरंजनासाठी किनारपट्टीवर मोकळ्या जागेची निर्मिती होईल, या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला. आता बांधण्यात येत असलेला ४ - ४ मार्गिकांचा असलेला दक्षिण कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून ते वांद्रे - वरळी पुलाच्या दक्षिण टोकापर्यंत आहे. याची तीन भागांत विभागणी केली आहे. प्रस्तावित कोस्टल रोडच्या किनाऱ्याकडील बाजूस २० मीटर रुंदीचा सलग असा प्रोमेनाईड असेल.
कोस्टल रोड दोन भागांत
दक्षिण भाग : प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत. (९.९८ किमी)
उत्तर भाग : वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या उत्तर टोकापासून कांदिवलीपर्यंत. (१९.२२ किमी)
पहिला भाग : प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शिनी गार्डनपर्यंत प्रामुख्याने मलबार हिलखालून जाणाऱ्या दोन स्वतंत्र बोगद्यांतून ४ किमीचा रस्ता.
दुसरा भाग : प्रियदर्शिनी गार्डन ते हाजी अली दर्ग्याजवळील बडोदा पॅलेसपर्यंत रेक्लेमेशनवरील व पुलावरील ३.८७ किमीचा मुख्य रस्ता व अमरसन्स गार्डन येथे ४ आर्म असलेला इंटरचेंज आणि हाजी अली दर्ग्याजवळील ८ आर्मचा इंटरचेंज रस्ता असेल.
तिसरा भाग : बडोदा पॅलेस ते वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत रेक्लेमेशनवरून व दोन पुलांवरील २.७१ किमीचा मुख्य रस्ता व वरळी येथील थडाणी जंक्शनसमोर ६ आर्मचा इंटरचेंज रस्ता असेल.
सुरुवातीला संयुक्त तांत्रिक समितीच्या अहवालात एकूण ३५.६ किलोमीटर कोस्टल रोडचे नियोजन केले होते. मात्र डीपीआर सल्लागाराच्या विस्तृत प्रकल्प आराखड्यात प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून कांदिवलीपर्यंत २९.२ किमी कोस्टल रोडचे नियोजन झाले. त्यामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून ते वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत ९.९८ किमी मुंबई दक्षिण कोस्टल रोड व वांद्रे - वरळी सागरी सेतू पुलाच्या उत्तर टोकापासून ते कांदिवलीपर्यंत १९.२२ किमी लांबीचा मुंबई उत्तर कोस्टल रोड दर्शविला. यामध्ये रेक्लेमेशन, बोगदे, पूल तयार करून रस्ता, प्रोमेनाईड, बगिचे, वाहनतळ, बस डेपो व इतर नागरी सुविधांचा समावेश आहे.
- शंकर ज. भोसले, कार्यकारी अभियंता, किनारी रस्ता, मुंबई महापालिका