मुंबई : शहर आणि उपनगरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील कोंडी फोडण्यात प्रशासकीय यंत्रणा यशस्वी ठरत आहे, मात्र कुर्ला पश्चिमेकडील कमानी सिग्नलपासून बैलबाजार पोलिस चौकीसह जरीमरी मार्गे साकीनाका जंक्शनपर्यंत कोंडी फोडण्यात यंत्रणेला अद्यापही यश आलेले नाही. दुर्दैव म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी या रस्त्यांवर हाती घेण्यात येणाऱ्या कामांसह कमानीपासून बैलबाजार पोलिस चौकीपर्यंत एक मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे काळे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांवर कुर्ला-अंधेरी रोड... नको रे बाबा... अशी म्हणण्याची वेळ सातत्याने येत आहे. दरम्यान, बंद करण्यात आलेला एकदिशा मार्ग सुरु करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
कुर्ला पश्चिमेकडील कमानी सिग्नलपासून बैलबाजार पोलिस चौकीसह जरीमरी मार्गे साकीनाका जंक्शनपर्यंत मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.
यामुळे कोंडीत भर :
जरीमरी परिसरातही महापालिकेने भूमिगत वाहिन्यांचे काम हाती घेत बॅरिकेडिंग केले आहे. त्यामुळे रस्त्या आणखी अरुंद झाला असून, चिंचोळ्या रस्त्यांवरून वाहने जात असून, कोंडीत दुप्पट भर पडली आहे.
रस्त्यावरून चालता येईना :
लाल बहादूर शास्त्री मार्गावर मायकल हायस्कूल येथे महापालिकेने काम हाती घेत बॅरिकेडिंग केले आहे. त्यामुळे हॉलीक्रॉस, मायकल शाळेच्या मुलांसह पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना अडचणी येत आहेत.
चिखलमिश्रित पाण्यामुळे त्रस्त :
कमानी जंक्शनवर वर्षापासून पालिकेच्या जमिनीखाली वाहिन्यांचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य कायम रस्त्यालगत पडून असते. त्यामुळे रस्ता अरुंद होतो. कामातून उडणारी धूळ आणि दुरुस्ती कामातून बाहेर पडणारे चिखलमिश्रित पाणी सातत्याने रस्त्यावरून वाहत असते. याचा त्रास होत आहे.
हॉलीक्रॉस, मायकल, कार्तिका, शिशु विकास मंदिर, भाटीया हायस्कूल, शिवाजी विद्यालय परिसरात आहे. अनेक कॉर्पोरेट ऑफिस या परिसरात गेल्या काही वर्षांत थाटली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांसह कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचा कोंडीचा मोठा फटका बसताे आहे.- प्रशांत बारामती
कमानी जंक्शनहून अंधेरी, कुर्ला, घाटकोपर अशा तीन दिशांना सहज जाता येते. शिवाय बीकेसीसारख्या हबकडे जाता येते. या मोठया स्पॉटवर जाणाऱ्या वाहनांचा भार सातत्याने अरुंद रस्त्यांवर पडत असल्याने कोंडी फुटण्याऐवजी वाढतच आहे.- नितीन महापुरे
बैलबाजार, जरीमरी या ठिकाणच्या कोंडीमुळे या परिसराचे भाडे रिक्षा, टॅक्सीवाले नाकारतात. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे एक ते दीड तास कोंडीत जातो.- संतोष गवळी