मुंबई : महालक्ष्मी येथील सातरस्ता परिसरात सोमवारी रस्ता खचल्याने, रस्ते कामांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची तक्रार या आधीच महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे खुद्द आयुक्तांनीच आता या प्रकरणी वॉर्डमधील अधिकाऱ्यांसह,कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या चौकशीची मागणी, मनसेचे विधानसभा अध्यक्ष विजय लिपारे यांनी केली आहे.लिपारे यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यातच महापालिका प्रशासनाला ई-वॉर्डमधील खड्ड्यांची तक्रार केली होती. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. ओबडधोबड रस्ते, मुख्य कंत्राटदाराकडून दुसºया कंत्राटदाराला दिलेले काम, काम सुरू असताना, अभियंत्यांची गैरहजेरी अशा अनेक प्रकारांची तक्रार मनसेने महापालिकेकडे केली होती. तरीही कोणतीही कारवाई झाली नसल्याने, आजघडीला हा अपघात घडल्याचे लिपारे यांनी सांगितले. त्यामुळे महिन्याभरात या संदर्भात आयुक्तांनी चौकशी लावली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही लिपारे यांनी दिला आहे.>खड्डा पडलेल्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने तातडीने धाव घेत, डागडुजीचे काम हाती घेतले, तोपर्यंत परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
महालक्ष्मी येथे रस्ता खचला, प्रशासनाचे केले दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 2:20 AM