मुंबई :चेंबूरमधील सायन-पनवेल महामार्ग व कुर्ला-माहुल मार्गावरील उमरशी बाप्पा चौक येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या चौकात पनवेल, सायन, कुर्ला व माहुल येथे जाणाऱ्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. यामुळे चारही दिशांना जाणाºया व येणाºया वाहनांसाठी या चौकातील खड्डे डोकेदुखी ठरत आहेत.
खड्ड्यांचा आकार मोठा असल्यामुळे येथे सतत या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून खिळखिळी बनत आहेत. दुचाकीस्वारांना या ठिकाणी दररोज अपघातांना सामोरे जावे लागते. येथील खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांना मणक्याचे आजार होत आहेत. या मार्गावरून कुर्ला रेल्वे स्थानक व माहुल गाव परिसरात रिक्षा जास्त प्रमाणात ये-जा करत असतात. मोठ्या आकाराच्या खड्ड्यांमुळे येथे रिक्षा उलटण्याचे प्रकारदेखील घडत आहेत. यामुळे शाळकरी मुलांना व चाकरमान्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
आधीच या परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यात रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीचा वेग अजून मंदावत आहे. तासन्तास या वाहतूककोंडीमध्ये अडकून राहावे लागल्यामुळे नागरिकांना कामावर पोहोचण्यासदेखील उशीर होत आहे. सायन, के.ई.एम.सारख्या दक्षिण मुंबईतील रुग्णालयांमध्ये जाताना रुग्णवाहिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. अशा वेळी रुग्णांना तसेच गर्भवती महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
काही वेळा वाहनांना या खड्ड्यांमुळे अचानक ब्रेक दाबावा लागल्यामुळे वाहने पाठीमागून एकमेकांवर आदळण्याच्या घटना घडत आहेत. कित्येक वेळा वाहतूक पोलीसच येथील खड्ड्यांमध्ये पेव्हरब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करताना आढळून येतात. नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे तक्रार करूनदेखील महानगरपालिका या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.