Join us

मुंबईत प्रमुख मार्गावरील रस्ता खचला, गर्दीच्या वेळात ट्रॅफिक जाम 

By महेश गलांडे | Published: October 12, 2020 11:09 AM

मुंबईत लोकलसेवा सुरू नसल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. पावसाळा सुरू असल्याने डोक्यावर छत्री किंवा अंगावर रेनकोट परिधान केल्याशिवाय पर्याय नाही.

मुंबई - राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून सर्वकाही पूर्वपदावर येण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्यापही लोकलसेवा बंदच असल्याने नागरिकांना बायरोड प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे, मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच, मुंबईत अद्याप सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. त्यामुळे, रस्त्यावरील गर्दी आणखी काही काळ वाढतच जाणार असल्याचे दिसून येते. 

मुंबईत लोकलसेवा सुरू नसल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. पावसाळा सुरू असल्याने डोक्यावर छत्री किंवा अंगावर रेनकोट परिधान केल्याशिवाय पर्याय नाही. त्यातच, शहरातील आणि मार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळेही नागरिकांसह प्रवासी चालकही त्रस्त झाले आहेत. मुंबईतील धारावी परिसराजवळ आज गर्दीच्या ठिकाणी रस्ता खचल्याचं पाहायला मिळालं. या खचलेल्या रस्त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत, ट्रॅफिक जाम झाले आहे. एका बाजूचा रस्ता प्रवासी नागरिकांसाठी व वाहतुकीसाठी बंद केला असून तेथे बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर या खचलेल्या रस्त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबईत कोरोनाचा अद्यापही प्रभाव

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख २७ हजार २७६ एवढी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना मुंबईत मात्र रोज २,२०० ते २,८०० नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत ९,३९१ रुग्णांचे मृत्यू झाले असून रुग्णालयाधीन म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही २५,३५८ एवढी झाली आहे. त्यामुळे, मुंबई अनलॉक करणे जोखीमेचं ठरेल, अशी प्रतिक्रियाही इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. 

टॅग्स :मुंबईरस्ते वाहतूकपाऊसलोकल