केम्स कॉर्नर उड्डाणपुलाला जोडणारा रस्ता महिनाभर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 01:39 AM2020-08-16T01:39:17+5:302020-08-16T01:39:36+5:30
केम्स कॉर्नर उड्डाणपुलाला जोडणारा एन.एस. पाटकरचा भाग एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईत संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटनेला दहा दिवस उलटूनही मुसळधार पावसामुळे त्या परिसरात पुन्हा दरड कोसळण्याचा धोका आहे. तांत्रिक समितीचे तज्ज्ञ आणि पालिका अधिकारी यांनी हँगिंग गार्डनजवळील दरड कोसळण्याच्या क्षेत्राची संयुक्त पाहणी केल्यानंतर ही गंभीर बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे केम्स कॉर्नर उड्डाणपुलाला जोडणारा एन.एस. पाटकरचा भाग एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे.
दक्षिण मुंबईत ६ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे हँगिंग गार्डननजीक बी.जी. खेर मार्गावरील संरक्षण भिंत कोसळली. यामुळे १५ झाडे मुळासकट उपटून रस्त्यावर दरड कोसळली होती. तसेच रस्त्याखालील जलवाहिनीचे नुकसान होऊन रस्त्याला तडे गेले होते. हा सर्व दगड-मातीचा ढिगारा एन.एस. पाटकर मार्गाच्या उत्तर दिशेला येऊन पडला. ही दुर्घटना रात्री उशिरा घडल्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र केम्प्स कॉर्नरजवळच्या भागात रस्ता बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. पेडर रोड हा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी एन.एस. पाटकर मार्गाचा दक्षिणेकडील भाग खुला करण्यात येणार होता. परंतु डोंगराच्या उतारावरील माती सैल झाली असल्याने दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.