मुंबई : धारावी येथील ६० फूट रस्त्यावरील काही भाग सोमवारी पहाटे खचला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणाला दुखापत झालेली नाही. मात्र मुख्य रस्त्यालाच तडा गेल्यामुळे येथील वाहतुकीला मोठा फटका बसला. सध्या या ठिकाणी बॅरिकेड्स लावून दुरुस्तीचे काम सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत रस्ता खचण्याची ही तिसरी घटना आहे.
मुसळधार पावसामुळे आॅगस्ट महिन्यात मलबार हिल येथील संरक्षण भिंत कोसळून बी.जी. खेर मार्गाला तडा गेला होता. त्यानंतर गेल्याच महिन्यात गिरगाव येथे मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर खड्डा पडला होता. त्यानंतर आता धारावीमध्ये सोमवारी रस्ता खचला. धारावी येथील बिस्मिल्ला हॉटेलसमोरील रस्त्याखालून मलनिस्सारण वाहिनी जाते. या वाहिनीतून गळती होत असल्याने मलनिस्सारण वाहिनीचे चेंबर कोसळून रस्त्याला मोठे भगदाड पडले.
याबाबत स्थानिक रहिवाशांनी पालिकेच्या जी उत्तर विभागाला कळवल्यानंतर मलनिस्सारण खात्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला. या रस्त्याखालील मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती करून त्यानंतर रस्त्याची डागडुजी केली जाणार आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने रात्रीच्या वेळेत वाहतूक कमी झाल्यानंतर दुरुस्तीचे काम वेगाने केले जाणार आहे.रस्त्याखालील मलनिस्सारण वाहिनीतून गळती होत असल्याने चेंबर कोसळले. त्यामुळे रस्त्याला खड्डा पडला. सध्या त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असून दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. - किरण दिघावकर, सहायक पालिकाआयुक्त, जी उत्तर विभाग