शेफाली परब-पंडित, मुंबईरस्ते दुरुस्ती घोटाळा उघड झाल्यानंतर झोप उडालेल्या मुंबई महापालिका प्रशासनाने या कामांवर नजर ठेवण्याची जबाबदारी दक्षता खात्यावर सोपविली आहे़ मात्र अपुरे मनुष्यबळ आणि साधनांच्या जोरावर दर्जेदार कामांची खातरजमा करणे दक्षता खात्यासाठी आव्हानच ठरणार आहे़ त्यामुळे रस्त्यांच्या दर्जाची ऐशीतैशी करण्यास ठेकेदारांना आजही रान मोकळे आहे़रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आढळून आले आहे़ ३५२ कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात थर्ड पार्टी आॅडिट कंपनीचेही हात गुंतले असल्याचे उजेडात आले़ कुंपणानेच शेत खाल्यामुळे पालिका प्रशासनाने रस्ते खात्यातील सर्व लेखापरीक्षकांना काढून अधिकाऱ्यांनाच रस्त्यांचा दर्जा तपासण्याचे आदेश दिले आहेत़ त्याचबरोबर दक्षता खात्यालाही यावर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली आहे़मात्र मनुष्यबळ मर्यादित असल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामावर नियमित देखरेख ठेवणे दक्षता खात्यालाही अवघड जाणार आहे़ या खात्याकडे पर्जन्य जलवाहिन्या, मलनिस्सारण प्रकल्प, उद्यान अशी शेकडो अन्य कामं असल्याने या विभागावर अतिरिक्त कामंचाच ताण आहे़ त्यामुळे प्रत्येक रस्त्याची तपासणी करणे अवघड असून, अचानक धाड टाकूनच रस्तेकामातील दर्जाची खातरजमा होऊ शकते, असा सूर या खात्यातील एका अधिकाऱ्याने लावला़दक्षता खात्याचे संख्याबळदर्जेदार कामाची खातरजमा करून पारदर्शक कामे करून घेण्याची जबाबदारी असलेल्या या खात्यात संपूर्ण २४ प्रशासकीय वॉर्डांमध्ये प्रत्येकी एक साहाय्यक अभियंता, शहर व पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी प्रत्येकी एक असे तीन कार्यकारी अभियंता, प्रमुख अभियंता आणि उपप्रमुख अभियंता असा कर्मचारी वर्ग आहे़असे आहे रस्ते घोटाळा प्रकरण...रस्त्यांच्या कामांमध्ये ३८ ते १०० टक्क्यांपर्यंत अनियमितता असल्याचा ठपका चौकशी समितीने ३४ रस्त्यांच्या पाहणीनंतर ठेवला होता़ रस्ते घोटाळ्यास जबाबदार असलेले बडे ठेकेदार मात्र आजही मोकाट आहेत. राजकीय वजन वापरून ही कारवाई ठेकेदारांनी लांबणीवर टाकली आहे़ म्हणूनच अद्याप एकाही ठेकेदाराला अटक झालेली नाही़ आगामी निवडणुकीसाठी फंड उभा करण्याकरिता शिवसेना-भाजपा या ठेकेदारांवर कारवाई टाळत असल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे़महत्त्वाच्या या खात्यासाठी जादा कर्मचारीवर्ग आणि दर्जोन्नती केल्यास असे घोटाळे रोखणे शक्य होईल़ मात्र अपुऱ्या मनुष्यबळामध्ये दर्जेदार कामांची हमी घेणे अवघड असल्याचा सूर अधिकाऱ्यांनी लावला आहे़आतापर्यंत २२ अटकेतमुंबई पोलिसांनी नियुक्त केलेल्या विशेष चौकशी पथकाने या प्रकरणात आतापर्यंत २२ जणांना अटक केली आहे़ यामध्ये थर्ड पार्टी आॅडिट कंपनीचे १० अधिकारी व अभियंत्यांचा समावेश आहे़ देखरेखीच्या कामात कसूर ठेवल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे़
रस्ते दुरुस्तीची ऐशीतैशी
By admin | Published: June 23, 2016 5:08 AM