एनआयएच्या तपासातून उघड
फेरा जिलेटीनचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कारमायकल रोडवरील स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पोलीस निरीक्षक सुनील मानेच्या मोबाईलमध्ये एक नकाशा सापडला आहे. त्यामध्ये चेंबूर ते कारमायकल रोडवरील अँटिलिया इमारतीपर्यंतचा मार्ग दर्शविण्यात आला आहे. त्यातून मानेचा जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्काॅर्पिओ ठेवण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सचिन वाझेने त्याच्या साथीदारासमवेत कट रचून २४ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानापासून ३ किलोमीटर अंतरावर पार्क केली होती. सुनील मानेच्या मोबाईलमध्ये त्याबाबतचा एक नकाशा आढळला आहे. त्यामुळे त्याला स्फोटक प्रकरणाची पूर्ण कल्पना असल्याचे स्पष्ट होते.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मानेने महत्त्वाची भूमिका निभावल्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. हिरेनच्या हत्येच्या दिवशी सुनील माने वाझेसमवेत होता. त्यानेच तावडेच्या नावे फोन करून त्याला बोलावून घेतले होते. मात्र त्याने त्याचा कार्यालयीन कामाच्या साठीच्या वापरातील मोबाईल मुद्दामहून एका बॅगेमध्ये ठेवून ती बॅग सहकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयाच्या परिसरातच ठेवली होती. जेणेकरून त्याचे लोकेशन क्राईम बँच असल्याचे दिसावे असा त्याचा हेतू होता.
.............................