Join us

ओबेरॉय मॉल ते फिल्म सिटी गेटपर्यंतचा रस्ता होणार ४५.७ मीटर रुंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 4:15 PM

पश्चिम द्रुतगती मार्ग ओबेरॉय मॉल येथील जंक्शन व इतर जंक्शन जवळील काम आद्यवत अशा मास्टिक पद्धतीने केले जाणार असून उर्वरित रस्ता सिमेंट काँक्रीटचा केला जाणार आहे.

मुंबई: पश्चिम उपनगराला पूर्व उपनगराशी जोडण्यासाठी तसेच दोन्ही ठिकाणची वाहतूक अधिक वेगवान करण्यासाठी पालिकेचा गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे. पवईमार्गे कांजूरमार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) किंवा आरे कॉलनीमार्गे भांडुप असे सध्याचे पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी मार्ग असले तरी पवई आणि जेव्हीएलआरला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर पर्याय म्हणून पालिकेने जेव्हीएलआर हा प्रकल्प राबवण्याचे निश्चित केले आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. काही दिवसातच हा प्रकल्प सुरू होणार आहे. 

तत्पूर्वी सध्या अस्तित्वात असलेल्या व पश्चिम द्रुतगती मार्ग ओबेरॉय मॉल ते फिल्म सिटी गेट पर्यंतच्या २.८२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे ४५.७ मीटर रुंदीकरण करणे अत्यावश्यक होते. यासाठी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर आणि आमदार सुनिल प्रभू यांच्यासह स्थापत्य समिती (उपनगर) अध्यक्षा व नगरसेविका साधना माने, शिवसेना नगरसेक तुळशीराम शिंदे व अँड. सुहास वाडकर यांनी पाठपुरावा करून रुंदीकरणाचे देखील काम महापालिकेकडून मंजूर करून घेतले. महापालिकेच्या 'गोरेगाव मुलुंड लिंक रोड विभागा'मार्फत रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. आमदार सुनिल प्रभू व स्थापत्य समिती (उपनगर) अध्यक्ष साधना माने यांच्या हस्ते नुकतीच या कामाची सुरुवात झाली.

पश्चिम द्रुतगती मार्ग ओबेरॉय मॉल येथील जंक्शन व इतर जंक्शन जवळील काम आद्यवत अशा मास्टिक पद्धतीने केले जाणार असून उर्वरित रस्ता सिमेंट काँक्रीटचा केला जाणार आहे. यामुळे दिंडोशी येथील नागरी निवारा परिषद, म्हाडा वसाहत, रहेजा वसाहत, आयटी पार्क, गोकुळधाम येथील रहिवाश्यांसह फिल्म सिटी आणि आयटी पार्क येथे कामासाठी जाणाऱ्या नोकरवर्गाचा प्रवास जलद होणार आहे. तसेच पावसाळ्यात ओबेरॉय मॉलच्या समोरील सखल भागात पाणी साचून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो तो देखील पूर्णपणे बंद होणार आहे. 

यावेळी नगरसेवक तुळशीराम शिंदे, नगरसेवक  अॅड. सुहास वाडकर, नगरसेवक आत्माराम चाचे, प्रशांत कदम, भाई परब, प्रशांत घोलप, चंद्रकांत वाडकर, संदीप जाधव, संपत मोरे, सीताराम मेस्त्री, पद्मा राऊळ, स्वाती पाटील, सुवर्णा खांबेकर यांच्या सह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई