Join us

खासगी संस्थांना पालिका शाळेबाहेरचा रस्ता; ३४९ संस्थांकडून जागा परत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 11:37 PM

खासगी संस्थांना देण्यात आलेल्या पालिका शाळेतील रिकाम्या वर्गखोल्या पुन्हा एकदा ताब्यात घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

मुंबई : खासगी संस्थांना देण्यात आलेल्या पालिका शाळेतील रिकाम्या वर्गखोल्या पुन्हा एकदा ताब्यात घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. शिक्षण संस्था, खाजगी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, राजकीय कामगार संघटनांकडे असलेल्या या वर्गखोल्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परत घेण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत ३४९ संस्थांकडून महापालिकेने वर्गखोल्या काढून घेतल्या आहेत. मात्र शैक्षणिक संस्थांकडून अद्याप वर्गखोल्या परत घेण्यात आलेल्या नाहीत.महापालिका शाळेतील पटसंख्या कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी वर्गखोल्या रिकाम्या असतात. २००७ पासून या वर्गखोल्या भाड्याने खाजगी संस्थांना देण्यास महापालिकेने सुरुवात केली. मात्र २०१३ नंतर या वर्गखोल्या संस्थांना न देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. याबाबत शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मुंबईतील खाजगी प्राथमिक शालेय इमारती धोकादायक झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र खाजगी शाळांना दुरुस्तीसाठी पर्यायी व्यवस्था करता येत नाही, त्यामुळे या खाजगी शाळांच्या आसपासच्या परिसरातील बंद पालिका शाळा किंवा वर्गखोल्या त्यांना पर्यायी व्यवस्थेसाठी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच खाजगी प्राथमिक शाळेची दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा या वर्गखोल्या संबंधित संस्था रिकामी करून देतील, असे सदस्यांनी सुचवले.मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना पालिकेच्या वर्गखोल्या न्यायालयाच्या निर्देशानुसार देता येणार नाहीत, असे उपायुक्त मिलिन सावंत यांनी सांगितले. पालिकेच्या शाळेत वर्गखोल्या असलेल्या शिक्षण संस्थावरील कारवाई धिम्या गतीने सुरू आहे. तसेच राजकीय पक्षांच्या कामगार संघटना, खाजगी स्वयंसेवी संस्था यांच्याकडून मात्र वर्गखोल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.>वर्गखोल्या घेणारप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात शिक्षण संस्थांकडून वर्गखोल्या घेण्यात येतील़विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा येणार नाही, याची काळजी घेण्यात येईल़ तरीही खाजगी शाळांना खोल्या देतील का याची पडताळणी होणार आहे़

टॅग्स :मुंबई महानगरपालिका