मुंबईतील रस्त्यावरचे खड्डे जिओ पॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:20 PM2022-07-29T20:20:56+5:302022-07-29T20:21:37+5:30

मुंबईतील रस्त्यांवर जोरदार पावसामुळे होणारे खड्डे भरून काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने जिओपॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Road potholes in Mumbai will be filled with geo polymer and rapid hardening concrete method | मुंबईतील रस्त्यावरचे खड्डे जिओ पॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार

मुंबईतील रस्त्यावरचे खड्डे जिओ पॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार

googlenewsNext

मुंबई

मुंबईतील रस्त्यांवर जोरदार पावसामुळे होणारे खड्डे भरून काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने जिओपॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगामी सुमारे १५ महिने कालावधीकरिता खड्डे भरण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निविदा प्रकाशित केल्या आहेत. या निविदांचे वैशिष्ट्य म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पंधरा महिने दोष दायित्व कालावधी राहणार आहे. त्याचप्रमाणे काम पूर्ण झाल्यावर ५० टक्के तर दोष दायित्व कालावधी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कम कंत्राटदारास दिली जाईल.

मुंबई महानगरात मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने डांबरी रस्त्यांवर खड्डे तयार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे खड्डे तात्काळ बुजवण्याची कार्यवाही केली जात असली तरी, सततचा जोरदार पाऊस आणि सोबतीला वाहतुकीचा ताण यामुळे कोल्डमिक्स सारख्या पारंपरिक तंत्रज्ञानाच्या वापरावरही मर्यादा येत आहेत आणि खड्डे भरल्यानंतरही काही कालावधीत पुन्हा खड्डे तयार होतात. या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी नुकताच विविध ठिकाणी रस्ते पाहणी दौरा केल्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी नवीन आणि प्रगत स्वरुपाच्या अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश रस्ते विभागाला दिले होते. त्यानुसार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले यांच्या देखरेखीखाली रस्ते विभागाने पूर्व मुक्त मार्गाच्या खाली दयाशंकर चौक, मुंबई पोर्ट ट्रस्टचा रस्ता तसेच आणिक-वडाळा मार्गावर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सादर केली होती. यामध्ये रॅपिड हार्डिंग काँक्रिट, एम ६० काँक्रिट भरून त्यावर स्टील प्लेट अंथरणे, जिओ पॉलिमर काँक्रिट आणि पेव्हर ब्लॉक या चार पद्धतींचे प्रायोगिक तत्त्वावर सादरीकरण करण्यात आले होते. या चारही पद्धतींच्या प्रात्यक्षिकाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी पाहणी केली होती.

यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या रस्ते विभागाची आढावा बैठक देखील घेण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबईत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची तसेच नवीन तंत्रज्ञानाची चाचपणी केल्याविषयी देखील मुख्यमंत्री महोदयांना माहिती दिली. रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर भरून, वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कायमस्वरूपी चांगला पर्याय अमलात आणावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते.

या पार्श्वभूमीवर, प्रायोगिक चाचणीमध्ये निदर्शनास आलेल्या निष्कर्षानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रॅपिड हार्डनिंग काँक्रीट आणि जिओ पॉलिमर या दोन नवीन व अभिनव पद्धतींचा उपयोग करून रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे हे तिन्ही विभाग मिळून सुमारे ५ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या एकूण पाच निविदा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. कार्यादेश दिल्यापासून पुढील पंधरा महिने कालावधीसाठी या निविदाद्वारे कंत्राटदार नियुक्त केले जातील. खड्डे भरण्याचा पंधरा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यापुढील पंधरा महिने दोष दायित्व कालावधी (DLP) लागू राहणार आहे. विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के तर दोष दायित्व कालावधी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कम कंत्राटदारास दिली जाईल. तशी तरतूद या निविदांमध्ये करण्यात आली आहे. सध्या प्रचलित पद्धतीमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर ८० टक्के तर दोष दायित्व कालावधीत २० टक्के रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते.

Web Title: Road potholes in Mumbai will be filled with geo polymer and rapid hardening concrete method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.