महाड, पोलादपूर तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था

By admin | Published: June 16, 2014 12:41 AM2014-06-16T00:41:20+5:302014-06-16T00:41:20+5:30

महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बस सेवा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद कराव्या लागणार असल्याने नागरिकांची फार मोठी गैरसोय होणार आहे.

Road relation in Mahad, Poladpur taluka | महाड, पोलादपूर तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था

महाड, पोलादपूर तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था

Next

महाड : महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बस सेवा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद कराव्या लागणार असल्याने नागरिकांची फार मोठी गैरसोय होणार आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील सुमारे सहा कोटीचे नवीन रस्त्यांचे प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले असले तरी निधी नसल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. नादुरूस्त रस्त्यांमुळे दळणवळणाची समस्या निर्माण होणार असल्याने पावसाला सुरूवात झाल्यानंतर अनेक गावांचा संपर्क तुटण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.
महाड येथील रायगड जिल्हा बांधकाम कार्यालयाने २०१३-१४ या वर्षासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचे दुरूस्ती आणि नवीन रस्ते तयार करण्याचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु वारंवार प्रस्ताव दाखल करूनही बांधकाम विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जाते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमांतून अनेक रस्त्यांची कामे करण्यात येतात. परंतु कामाची गुणवत्ता अत्यंत कमी दर्जाची असल्याने सहा महिन्यांतच रस्त्याची दुरवस्था झालेली दिसून येते. आठ दिवसापूर्वी विन्हेरे गिझेवाडी रस्त्याचे काम करण्यात आले. पहिल्या पावसातच हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
तालुक्यातील सावाद-घारवली हा सहा कि.मी. रस्त्यापैकी ३ कि.मी रस्त्याचे काम गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. सुमारे ३.५ लाखांचा निधी नाबार्डमधून खर्च करण्यात आला. एक वर्षाच्या आतच रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून जागोजागी खड्डे पडल्याने वाहने देखील जाऊ शकणार नाहीत, अशी अवस्था सावाद -घारवली रस्त्याची झाले आहे. महाड तालुक्यातील राजिवली गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे नादुरूस्त झाल्याने येत्या पावसाळ्यात दळणवळण पूर्ण बंद होणार आहे. पावसापूर्वी हा रस्ता दुरूस्त करणे आवश्यक असल्याने जिल्हा परिषदेकडे दुरूस्तीचा प्रस्ताव करण्यात आला. अद्याप मंजुरी देण्यात आली नसल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची साधी दुरूस्ती देखील होणार नाही.
रेवतळे मुंबर्शी पिंपळकोंड रस्त्याची मागणी अनेक वर्षांची आहे. पिंपळकोड गावाकडे जाणारा रस्ता वन विभागाच्या जागेतून जात असल्याने वनविभागाने हा रस्ता तयार करण्यास आक्षेप घेतला आहे. त्यानंतर पिंपळकोंड भोमजाई मुंबर्शी रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर आठ-दहा वर्षात या रस्त्याची साधी दुरूस्तीदेखील करण्यात आली नसल्याने पावसाळा सुरू होताच एसटी सेवा बंद करावी लागते. त्यामुळे ग्रामस्थांना आठ-दहा कि.मी. पायपीट करावी लागते. दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नसल्याने पिंपळकोंड ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जाते.
नाते अड्राई हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरूस्त आहे.खर्डी, नगरभुवन, बांधणीचा माळ ते आमडोशी या रस्त्याची देखील दुरवस्था झाल्याने बाराही महिने या मार्गावरून वाहने जाऊ शकणार नाहीत. गेल्या वीस वर्षात या रस्त्यांवर साधे डांबर देखील टाकण्यात आले नसल्याने रस्त्याची दुरवस्था कायम राहिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Road relation in Mahad, Poladpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.