रस्ते घोटाळा : घोटाळेबाज अधिका-यांच्या चौकशीत दिरंगाई, दोन महिन्यांत अहवाल देण्याची आयुक्तांची ताकीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:30 AM2017-11-14T02:30:41+5:302017-11-14T02:31:12+5:30
रस्ते घोटाळ्यात ठपका ठेवण्यात आलेल्या अधिका-यांवरील कारवाई अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. याउलट चौकशीसाठी नियुक्त केलेल्या अधिका-यांनी मुदत वाढवून मागितली आहे.
मुंबई : रस्ते घोटाळ्यात ठपका ठेवण्यात आलेल्या अधिका-यांवरील कारवाई अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. याउलट चौकशीसाठी नियुक्त केलेल्या अधिका-यांनी मुदत वाढवून मागितली आहे. त्यानुसार, आयुक्त अजय मेहता यांनी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र, या मुदतीत चौकशी पूर्ण न झाल्यास, संबंधित अधिकाºयांनाच कारवाईचा सामना करावा लागेल, अशी ताकीदच त्यांनी दिली आहे.
मुंबईतील २३४ रस्त्यांच्या कामात अनियमितता असल्याचे दोन वर्षांपूर्वी उघडकीस आले. त्यात दोषी ठेकेदार व अधिकाºयांवर दोन टप्प्यांत कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. पहिल्या टप्प्यात ३४ रस्त्यांची चौकशी करून, त्यात दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली. उर्वरित दोनशे रस्त्यांच्या चौकशीत दोषी ठरलेल्या ठेकेदारांना कारवाईला सामोरे जावे लागले. या घोटाळ्यात अभियंते व संबंधित अधिकाºयांवर चौकशी अहवालातून ठपका ठेवण्यात आला होता.
या दोषी अभियंता, अधिकाºयांची जबाबदारी निश्चित करून, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार, या चौकशीची जबाबदारी उपायुक्त रमेश बांबळे व चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, वर्ष उलटले, तरी या चौकशीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
अधिकाºयांनाच समज
याबाबत आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन संबंधित अधिकाºयांना या दिरंगाईचा जाब विचारला. या बैठकीत अधिकाºयांनी मागितलेली मुदतवाढ आयुक्तांनी मान्य केली. मात्र, या मुदतीत चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर तुमच्यावरच कारवाई होईल, असे आयुक्तांनी बजावल्याचे सूत्रांकडून समजते.