वाहनांचा वेग मंदावल्याने रस्ते‘कोंडी’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 03:01 AM2019-08-04T03:01:21+5:302019-08-04T03:01:41+5:30
पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प
मुंबई : मुंबईत शनिवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली, तर काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
एस. व्ही. रोड अंधेरी, सबवे सिद्धेश्वर मंदिर जेट्टीजवळ, कांदिवली येथे हनुमाननगर परिसरात पाणी साचले होते. एस. व्ही. रोड बेहराम बाग जंक्शन येथे तर गुडघाभर पाणी साचले होते. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिनेमागृह, कमानी, घाटकोपर येथील श्रेयस टॉकीज येथील वाहतुकीचा वेग मंदावल्याने वाहतूककोंडीत वाढ झाली. भांडुप येथील सरदार प्रताप सिंग जनता मार्केट, लिंक रोड इनॉर्बिट अँड इन्फिनिटी मॉलच्या पूर्ण परिसरात पाणी साचले. दादरच्या हिंदमाता येथे पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. भायखळा, लालबाग, परळ, माटुंगा, वडाळा आणि सायन येथे वाहतुकीचा वेग मंदावला होता.
कांजूरमार्ग पश्चिम आणि गांधीनगर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे व इस्टर्न एक्स्प्रेस हायवे नेताजी पालकर चौकाला जोडणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील जनकल्याणनगर, मालाड पश्चिम येथे पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अंधेरी पूर्वेतील जे. बी. नगर, कांदिवली पूर्व येथील स्टेशन रोड, दहिसर हायवे चेक पोस्टजवळ पाणी भरले होते, तर समतानगर येथे साचलेल्या पाण्याची पातळी सहा फुटांपर्यंत पोहोचली होती. यासोबतच चंचोली पोर्ट रोडवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली होती.
सायन-ट्रॉम्बे मार्गावर वाहतूककोंडी
मुसळधार पावसामुळे सायन-ट्रॉम्बे मार्गावर देवनार सिग्नल, डायमंड गार्डन, चेंबूर नाका, उमरशी बाप्पा चौक, एव्हरार्डनगर व सायन सिग्नल या महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. बीकेसी ते मंडाळे मेट्रो कामामुळे आधीच येथे वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यात डायमंड गार्डन व उमरशी बाप्पा चौक या ठिकाणच्या खड्ड्यांमुळे व उमरशी बाप्पा चौक ते सुमननगर येथे साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग अधिकच मंदावला. एनएसजी सेंटरच्या दोन्ही बाजूला, तसेच इतर ठिकाणीही खड्ड्यांमुळे दोन ते तीन किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कलानगर जंक्शन स्लिप रोड हा खड्ड्यांमुळे बंद करण्यात आला होता.
रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे बºयाच जणांनी बस, रिक्षा, टॅक्सीचा आधार घेतला. यामुळे रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम जाणवला. सायंकाळी या मार्गावर नवी मुंबईच्या दिशेला जाताना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरा वाहतूक पूर्वपदावर आली.
‘सत्ताधाऱ्यांनी पाणी भरून दाखविलं’
मातोश्री सोडून कलानगरचा पूर्व भाग, शासकीय वसाहत, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे सर्वच पाण्याखाली गेले आहे. ‘पालिकेच्या सत्ताधाºयांनी पाणी भरून दाखविलं,’ असे टिष्ट्वट करून नागरिकांनी सत्ताधाºयांना सुनावले.
पवईतील सब वे बंद
मिठी नदी भरून वाहत असल्याने मोरारजीनगर, पवई येथील सब वे बंद करण्यात आला होता. दरम्यान, ज्यांना आरे रोडने जायचे असेल, त्यांनी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडचा वापर करावा, असे आवाहन पवई पोलिसांकडून करण्यात येत होते.
येथे साचले पाणी
हिंदमाता, वडाळा, सायन, माटुंगा येथील गांधी मार्केट, कांदिवली, बोरीवली, दहिसर, अंधेरी, चेंबूर, घाटकोपर, विद्याविहार येथील सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते.
सोशल मीडियावरून व्यक्त केली नाराजी
सायन उड्डाणपुलावर काही प्रवासी १ ते २ तास अडकून पडले होते. त्यामुळे त्यांनी टिष्ट्वटर, फेसबुकच्या माध्यमातून नेटकºयांनी हाच का विकास? असा सवाल विचारत आपली नाराजी व्यक्त केली.