मुंबईत खड्ड्यांमुळे रस्ते वाहतुकीचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:44 AM2019-09-16T00:44:35+5:302019-09-16T00:44:42+5:30
मुंबईतील रस्ते बांधकामासाठी पालिका प्रशासन आणि सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते.
मुंबई : मुंबईतील रस्ते बांधकामासाठी पालिका प्रशासन आणि सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र अनेक ठिकाणी अल्पावधीतच रस्त्यांची चाळण होऊन रस्ते खड्डेमय होतात. या खड्ड्यांमुळे रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
मुंबई व उपनगरांत सध्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कल्पना टॉकीज ते विमानतळ मार्ग, कालिना मिल्ट्री कॅम्प दरम्यान मोठे खड्डे असून त्याचा वाहनचालकांना फटका बसत आहे. तर सायन-पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत, त्यातच मार्गावरील खड्ड्यांमुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागतात. तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीमुळे प्रवाशांचे तासन्तास वाया जातात. याबाबत वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार म्हणाले की, सर्वच रस्ते खराब नाहीत. काही चांगले आहेत, काही खराब आहेत. पण जे रस्ते खराब आहेत, ते वारंवार खराब होत आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे प्राण जातात. वाहनेही खराब होतात. वाहतुकीवर परिणाम होतो. जर रस्ते चांगले नसतील तर कंत्राटदारावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्याची काय गरज आहे. खड्डेदुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा, असेही ते म्हणाले. तर जय भगवान ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे राजेंद्र वनवे यांनी सांगितले की, मुंबईत असलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर होतात. वाहन डागडुजीचा खर्च वाढतो. वाहतूककोंडीमुळे ठरलेल्या वेळेत माल घेऊन पोहोचता येत नाही. वाहने बंद पडतात़ अपघात घडतात़ काही जणांना जीवही गमवावा लागतो़